KPD26B13293
धुळे : मुख्यमंत्री सहायता निधी मंजूरीचे पत्र पवार यांना देतांना सरपंच ज्ञानज्योती भदाणे.
--
यकृत प्रत्यारोपणासाठी
साडेतीन लाखांची मदत
-
फागणेच्या भटू पवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दिलासा
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ५ : फागणे (ता. धुळे) येथील भटू प्रकाश पवार यांच्या यकृत प्रत्यारोपणाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख ५० हजार रुपयांची भरीव आर्थिक मदत मंजूर झाली आहे. आमदार राम भदाणे यांच्या पाठपुराव्यामुळे ही मदत मिळाली असून, मदत मंजुरीचे पत्र माजी सभापती तथा सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांच्या हस्ते कुटुंबियांना देण्यात आले.
-
भटू पवार यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी याबाबत आमदार भदाणे यांना माहिती दिली. आमदार भदाणे यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश मिळून मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेतीन लाख रुपये मंजूर झाले जी रक्कम नवी मुंबईस्थित अपोलो हॉस्पिटल यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. या आर्थिक मदतीमुळे भटू पवार यांच्या जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला बळ मिळाले आहे. या मदतीबद्दल पवार कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राम भदाणे, मुख्यमंत्री सचिवालयाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक, राज्याचे वैद्यकीय समन्वयक डॉ. स्वानंद सोनार, राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. मनोज विसपुते यांचे आभार व्यक्त केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील, कमलेश भोई, कपिल पिवाल आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार प्रतिनिधी वीरपाल गिरासे यांनी मंजुरीसाठी सहकार्य केले.