(पान ४ ला सेकंड मेन)
KPD26B13365, KPD26B13366
देवभाने : शिवारात पावसाअभावी करपलेले मका पीक. दुसऱ्या छायाचित्रात धमाणे शिवारात वाढ खुंटलेले कपाशीचे पीक.
-----------
धुळे तालुक्यात पावसाअभावी पिके होरपळली
आता पाऊस पडून हाती काय लागणार; शेतकऱ्यांचा प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. १९ : धुळे तालुक्यात ३१ जुलैला झालेल्या अतिवृष्टीनंतर तब्बल दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी, तालुक्यातील खरीप हंगामातील पिके होरपळून गेली असून, आता पाऊस पडूनही हाती काही लागणार नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
धुळे तालुक्यात यंदा पेरणी तीन आठवडे उशिरा झाली होती. मात्र, जुलैअखेरच्या पावसानंतर पावसाचा खंड पडला. गेल्या ४५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतातील ओलावा संपला आहे. बाजरी, ज्वारी, मका, कपाशी या मुख्य पिकांची वाढ खुंटली असून, पाने पिवळी पडून पिके करपत आहेत. कापसाची बोंडे धरलीच नाहीत, तर बाजरी, ज्वारी व मक्याची कणसे भरली नाहीत.
सर्वात मोठा फटका कडधान्य पिकांना बसला आहे. मूग, उडीद, मठ व चवळी यांचे उत्पादन नसल्यात जमा झाले आहे. ही पिके वखरली गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, त्यांचा खर्चही वाया गेला आहे. मशागत, बियाणे, खते, फवारणी यासाठी हजारो रुपये खर्च करूनही पीक हाती न आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
कापडणे, सोनगीर, नगाव, वलवाडी, बोरकुंड, लामकानी, नेर, कुंडाणे, मोराणे, मुकटी, आर्वी, लामकानी, कुसूंबा, सडगाव परिसरात परिस्थिती अधिक गंभीर आहे. विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पिकांना पाणी देणेही शक्य नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. करपलेल्या पिके जनावरांचे वैरण झाले आहे.
दरम्यान, शासनाने तातडीने पंचनामे करून धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीकविमा आणि चारा छावण्यांची मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.