(पान ४ ला मेन)
KPD26B13375, KPD26B13374
कापडणे : जोगाई माता महिला काॅटन जिनींग व प्रेसिंगवर कापसाच्या खरेदीप्रसंगी उपस्थित शेतकरी. दुसऱ्या छायाचित्रात मध्यप्रदेशमधील ठिकरी येथून आलेले कापूस घेऊन आलेले ट्रॅक्टर.
--------
कापसाला पहिल्याच दिवशी ८,७११ रुपयांचा भाव
कापडणेतील जोगाई माता महिला जिनिंगमध्ये खरेदीला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. २० : खानदेशातील पूर्वहंगामी बागायती कापसाच्या खरेदीला आता जोरदार सुरुवात झाली आहे. कापसाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कापडणे येथील जोगाई माता महिला कॉटन जिनिंग ॲन्ड प्रेसिंगने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेशा केला. पहिल्याच दिवशी प्रतिक्विंटल आठ हजार ७११ रुपयांचा भाव जाहीर करण्यात आला. शासनाच्या हमीभावापेक्षा सुमारे शंभर रुपये अधिक भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जोगाई माता महिला कॉटन जिनिंग ॲन्ड प्रेसिंगने खरेदी सुरू करताच शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी कापूस घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा जिनिंग परिसरात लागल्या होत्या. खासगी व्यापाऱ्यांनी गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात केली होती. त्यावेळी प्रतिक्विंटल आठ हजार १०० रुपयांचा दर देण्यात आला होता. त्यामुळे महिला संचालक मंडळाकडून कापसाला किती भाव मिळतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. जिनिंगने हमीभावापेक्षा अधिक दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीलाच चांगला दर मिळाल्याने आगामी काळात कापसाच्या भावात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
या वेळी अरुण पाटील, महसूल मंडल अधिकारी मनोहर पाटील, धनूरचे सरपंच चेतन शिंदे, महेश पाटील, सुरेश बोरसे, बाळासाहेब शिंदे, बन्सीलाल पाटील, स्वप्निल पाटील, राकेश पाटील, माजी सरपंच हरीश पाटील, माजी उपसरपंच मनोज पाटील, धर्मेंद्र पाटील, संभाजी पाटील, विनोद पाटील, पुरोहित हर्षल जोशी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या
शासनाने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी ८ हजार ६६७ रुपये, तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी ८ हजार ६१० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारातील दरही हमीभावाच्या आसपास पोहोचला असून, त्यात जिनिंगकडून हमीभावापेक्षा अधिक दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यंदा बागायती कापसाचे उत्पादन समाधानकारक होण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाअभावी कोरडवाहू कापूस हंगाम अडचणीत आला आहे. त्यामुळे बागायती कापूस उत्पादकांना मिळणारा दर अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच आठ हजार ७११ रुपयांचा दर मिळाल्याने कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
---------
शासनाचा हमीभाव
कापूस-------------------प्रतिक्विंटल
लांब धाग्याचा कापूस-------८६६७
मध्यम प्रतीचा कापूस------८६१०
जोगाईमाता जिनिंगचा दर
कापूस-----------------प्रतिक्विंटल
लांब धाग्याचा कापूस-----८७११
मध्यम प्रतिचा कापूस-----८७००
---
मध्य प्रदेशमधील
कापूस खानदेशात
धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील कापूस मध्यप्रदेशमध्ये अधिक विक्रीसाठी जात होता. आता मात्र स्थानिक जिनींग व्यावसायिकांनी अधिक दर जाहिर केले आहेत. परिणामी, तिकडचा कापूस खानदेशात विक्रीसाठी येवू लागला आहे. ठिकरी येथील शेतकरी कापूस विक्रीसाठी खानदेशात येत आहेत. चांगल्या दराने ते सुखावले आहेत.