३६-३
माहितीचा अधिकार आता ‘महाग’!
----------
अर्जदारांच्या खिशाला कात्री; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप
----------
संदीप मोगल ः सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता. २५ : पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्त्यांना शासनाने धक्का दिला आहे. सर्वसामान्यांचे हक्काचे शस्त्र असलेल्या माहिती अधिकाराच्या शुल्कात तब्बल तिप्पट वाढ करण्यात आली आहे. आता माहितीचा अर्ज करण्यासाठी १० रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. माहितीच्या प्रतींसाठीही दुप्पट खर्च सोसावा लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळविणे आता अधिक खर्चिक झाले आहे. या शुल्कवाढीवर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या मते ही शुल्कवाढ म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा आणि प्रशासनातील पारदर्शकता संपविण्याचा प्रयत्न आहे. १० रुपयांचा अर्ज ३० रुपयांना करणे आणि दोन रुपयांची झेरॉक्स पाच रुपयांना करणे, हा थेट सर्वसामान्यांच्या माहिती मिळविण्याच्या हक्कावर गदा आणणारा निर्णय आहे.
माहिती अधिकारामुळे आजवर अनेक मोठे घोटाळे बाहेर आले आहेत आणि प्रशासनावर वचक राहिला आहे. मात्र, या दरवाढीमुळे गरीब आणि गरजू नागरिकांना माहिती मागविणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहणार नाही. ‘डिजिटल इंडिया’च्या काळात जिथे कागदाचा वापर कमी करून खर्च कमी व्हायला हवा, तिथे झेरॉक्सचे दर वाढविणे अनाकलनीय आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
-----------
कोट
अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये हजारो पानांची माहिती काढावी लागते. आता पाच रुपये प्रतिपान या हिशेबाने सर्वसामान्य किंवा गरीब अर्जदार एवढा खर्च कसा करणार? भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून तर ही चलाखी केली जात नाही ना, अशी शंका येते.
-मनोज निकम, आरटीआय कार्यकर्ते
--------------