04734
दिंडोरी ः पंचायत समिती आवारातील सार्वजनिक स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले व्हावे, यासाठी मनसेतर्फे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी.
अखेर ‘ते’ सार्वजनिक स्वच्छतागृह खुले
दिंडोरी ः मनसेच्या पाठपुराव्याला अखेर यश सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता. २३ : दिंडोरी येथील जुन्या पंचायत समिती परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी बंद होते. या स्वच्छतागृहाचा वापर केवळ तेथील शासकीय कर्मचारीच करत असल्याने शासकीय कामासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. मनसेच्या या दणक्यानंतर अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, मंगळवारी (ता. २३) हे सार्वजनिक स्वच्छतागृह सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
दिंडोरी येथील जुन्या पंचायत समितीच्या आवारात नागरिकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक स्वच्छतागृ बांधण्यात आले आहे. मात्र, काही दिवसांपासून ते कुलूपबंद ठेवले जात होते. तेथील कर्मचाऱ्यांकडेच याच्या चाव्या असायच्या आणि ते स्वतःपुरताच याचा वापर करत होते. दूरवरून येणाऱ्या नागरिकांना आणि वृद्धांना स्वच्छतागृहासाठी भटकंती करावी लागत होती. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या गंभीर समस्येची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष नामदेव गावित यांनी पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यापुढे झुकत प्रशासनाने बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने जनतेसाठी खुले केले. मनसे तालुकाध्यक्ष नामदेव गावित यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मुरलीधर कनोजे, संतोष भोई आदी उपस्थित होते.