पान-१--मेन करणे-- चित्र वापरणे
-------------------
जांबुटके औद्योगिक वसाहतीचा श्रीगणेशा
--------------
पायाभूत सुविधांसाठी औद्योगिक महामंडळाकडून ५९ कोटींची निविदा, कामांना चालना मिळणार
--------------
संदीप मोगल : सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता.१७ : जांबुटके येथे प्रस्तावित आदिवासी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तब्बल ५९ कोटी ७३ लाख ८६ हजार रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जांबुटके औद्योगिक क्षेत्राच्या प्रत्यक्ष विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ लगत सुमारे २९.५२ हेक्टर क्षेत्रावर हे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. येथे उद्योगांसाठी भूखंडांसोबतच पाणी, वीज, अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाइट, तयार औद्योगिक शेड तसेच सामुदायिक सुविधांची उभारणी केली जाणार आहे. या सुविधांमुळे दिंडोरी तालुक्यातील औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
१६-१
२०२२ मध्ये झाली होती घोषणा
जांबुटके येथे राज्यातील पहिले आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री (स्व) अजित पवार यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात केली होती. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यातून या प्रकल्पाला आकार देण्यात आला. त्यावेळी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर १ डिसेंबर २०२२ ला अधिसूचना प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर काही काळ प्रकल्पाची कार्यवाही संथ झाली. अखेर १७ जून २०२५ ला मंत्रिमंडळाने जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर २ एप्रिल २०२६ ला महसूल व वन विभागाने २९.५२ हेक्टर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली. आता पायाभूत सुविधांसाठी टेंडर प्रसिद्ध झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
१६-१ चौकट
५८ ‘प्लग-अँड-प्ले’ शेड
जांबुटके औद्योगिक क्षेत्राचे विशेष आकर्षण म्हणजे उद्योजकांसाठी प्रस्तावित ५८ ‘प्लग-अँड-प्ले’ शेड. प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग तंत्रज्ञानाचा वापर करून या शेडची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक शेडला अंतर्गत रस्ता, प्रारंभिक डांबरीकरण, कंपाउंड वॉल आणि प्रवेशद्वाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे उद्योजकांना स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्याची आवश्यकता कमी होऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार जागा उपलब्ध होणार आहे.
---------------
जमीन, पाणी, वीज, अंतर्गत रस्ते, प्रकाशव्यवस्था आणि तयार शेड अशा मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास जांबुटके औद्योगिक क्षेत्र उद्योजकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः आदिवासी भागातील युवकांना उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ५९.७३ कोटींच्या पायाभूत सुविधांच्या टेंडरमुळे जांबुटके औद्योगिक क्षेत्राच्या प्रत्यक्ष उभारणीचा ‘श्रीगणेशा’ झाला असून, आता कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होते याकडे दिंडोरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
-------
कोट
जांबुटके येथील आदिवासी औद्योगिक क्लस्टर हा केवळ औद्योगिक प्रकल्प नसून दिंडोरीच्या आदिवासी बांधवांना रोजगार, उद्योग आणि आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या संधी देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. पायाभूत सुविधांच्या कामाला सुरुवात होत असल्याने या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष आकार मिळत असून, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री.
------------