फोटो : 05054, 05055, 05056
दिंडोरी ः पूर्व भागात छाटणी झालेल्या द्राक्षबागेला पेस्ट करताना कामगार. (छायाचित्र :- संदीप मोगल)
दिंडोरीत द्राक्षबागांच्या फळ छाटणीला प्रारंभ
गेल्या वर्षीच्या नुकसानीनंतर भांडवलाची जुळवाजुळव करताना बळीराजा मेटाकुटीस
संदीप मोगल : सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता. २० ः दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागात आगामी द्राक्ष हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या द्राक्षबागांच्या फळ छाटणी कामांना सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी अस्मानी संकट आणि प्रतिकूल हवामानामुळे येथील सुमारे ६० ते ७० टक्के द्राक्षबागा उत्पादनविना उभ्या राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. वर्षभराचा खर्च अंगावर पडूनही उत्पन्न शून्य राहिल्याने यंदा नवीन हंगामासाठी लागणाऱ्या भांडवलाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असे असतानाही, हा कटू अनुभव मागे सारून यंदा निसर्गाची साथ लाभेल आणि चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी द्राक्ष हंगामास प्रारंभ केला आहे.
..............
ऐन हंगामाच्या तोंडावर परिसरातील द्राक्षबागांमध्ये मशागत, औषध फवारणी आणि छाटणीसाठी शेतकरी व मजुरांची लगबग सुरू आहे. दर्जेदार आणि निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या पट्ट्यात वातावरणातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी फळ छाटणीचे नियोजन केले आहे. वेळेत माल बाजारात आणून चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी बागायतदारांची धावपळ सुरू आहे.
एकीकडे भांडवलाची चणचण, तर दुसरीकडे खते, औषधांचे गगनाला भिडलेले भाव आणि वाढती मजुरी यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. एकाच वेळी छाटणीची कामे सुरू झाल्याने स्थानिक व परजिल्ह्यातील मजुरांची जुळवाजुळव करताना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतकरी छाटणीपूर्वी वेलींची ताकद वाढवण्यासाठी खते, अन्नद्रव्ये देणे, पेस्ट लावणे व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्यांवर भर देणे, बागेतील गाजरगवताची विल्हेवाट लावण्यासाठी तणनाशक फवारणी करणे आदी कामे वेगात सुरू आहेत.
पावसाने उघडीप दिल्याने कामांना गती आली असून, टोमॅटो व इतर भाजीपाल्याची कामेही सुरू असल्याने शेतशिवारात वर्दळ दिसत आहे. आर्थिक अडचणींचा डोंगर समोर उभा असतानाही यंदा हवामान अनुकूल राहील आणि निसर्गाची कृपादृष्टी लाभून नुकसानीची भर निघेल, या विश्वासाने शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने शेतात घाम गाळत आहेत.
............