मुंगसे बाजारात कांद्याची आवक घसरली
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १५ : येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा विक्री केंद्रावर उन्हाळी कांद्याची आवक घटली आहे. कांद्याला पुरेसा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणण्यास हात आखडता घेतला आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विक्री केली. खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेने बाजारातील आवक निम्म्याने घटली आहे.
मुंगसे बाजारात जेमतेम ४०० ते ५०० वाहनातून कांदा विक्रीसाठी येत आहे. भाव मिळत नसला तरी लग्न सोहळे व घर खर्चासाठी पैसे लागत असल्याने शेतकऱ्यांनी अत्यंत कमी दरात कांद्याची विक्री केली. बहुतांशी शेतकऱ्यांचा कांदा ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने विकला गेला. काही कांद्याला तर २०० ते ३०० रुपये एवढाच भाव मिळाला. उन्हाळी सुपर कांद्याचा भाव ९०० ते ११०० रुपये दरम्यान आहे. मात्र किरकोळ वाहनातील कांद्याला हा भाव मिळाला. ऐव्हरेज सुपर ६८० ते ९१०, गोल्टी-गोल्टा ३५० ते ६२० रुपये भाव होता.
भविष्यात चांगला भाव मिळेल या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा भरून ठेवला आहे. गेल्या महिन्यात झालेला बेमोसमी पाऊस व गारपिटीत कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले. तीन आठवड्यापासून प्रचंड ऊन पडत असल्याने चाळींमधील कांदा देखील खराब होवू लागला आहे. पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. किरकोळ बाजारात देखील कांद्याला जेमतेम ७ ते ८ रुपये किलोचा भाव मिळत आहे.