टिप : टुडे पान १ साठी
----
फोटो -15317
मालेगाव : विजयाची खूण करतांना उमेदवार व शिवसेना कार्यकर्ते.
----
शेतकरी संघावर शिवसेनेचा भगवा;
भुसे समर्थकांचे सर्व १५ जागांवर वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २२ : येथील शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत सर्व १५ जागांवर कब्जा केला. संघाच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला असून मंत्री भुसे यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. युवा नेते अद्वय हिरे समर्थित पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे संघावरील हिरे कुटुंबीयांचे दीर्घकालीन वर्चस्व संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संघाच्या १५ जागांसाठी रविवारी (ता. २१) मतदान पार पडले. सोमवारी (ता. २२) सटाणा नाका येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. शेतकरी विकास पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते, तर अद्वय हिरे समर्थकांनी नऊ जागांवर उमेदवारी दिली होती.
सोसायटी गटातून आत्माराम आधार अहिरे, सुभाष सोनू गिल, सचिन एकनाथ साळुंके, ईश्वर महादू सिसोदे (मांडवडे), दिनकर महादू चव्हाण आणि आकाश मधुकर हिरे विजयी झाले. वैयक्तिक सभासद सर्वसाधारण गटातून मधुकर देवमन देवरे, विजय लहु निकम, रविंद्र बळीराम शेवाळे आणि मयूर केवळ हिरे यांनी विजय मिळविला.
महिला राखीव गटातून मंगला धर्मा भामरे व पुष्पा मुरलीधर शिंदे, इतर मागास प्रवर्ग गटातून अनिल देवराम निकम, अनुसूचित जाती-जमाती गटातून काळू खंडू ठाकरे तर विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून प्रदीपकुमार नवलसिंग पवार विजयी झाले.
निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. प्रचारकाळात शेतकरी विकास पॅनलने मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिल्याचे दिसून आले. दुसरीकडे विरोधी गटाकडून अपेक्षित उत्साह दिसून आला नाही. या विजयामुळे शेतकरी संघावर प्रथमच शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली असून संघाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार मंत्री भुसे यांनी व्यक्त केला आहे.
चौकट
विजयी उमेदवार
सोसायटी गट : आत्माराम अहिरे, सुभाष गिल, सचिन साळुंके, ईश्वर सिसोदे, दिनकर चव्हाण, आकाश हिरे
वैयक्तिक सभासद गट : मधुकर देवरे, विजय निकम, रविंद्र शेवाळे, मयूर हिरे
महिला राखीव : मंगला भामरे, पुष्पा शिंदे
इतर मागास प्रवर्ग : अनिल निकम
अनुसूचित जाती-जमाती : काळू ठाकरे
विमुक्त जाती-भटक्या जमाती : प्रदीपकुमार पवार