गुन्हे वृत्त
--
चंदनपुरीत घरफोडी;
दीड लाख लंपास
मालेगाव : येथील चंदनपुरी शिवारातील मुस्तफा जाकीर हुसैन मुल्ला (वय ५४, रा. बोहरी कॉलनी) यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी कपाटात ठेवलेले रोख १ लाख ५६ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. बुधवारी (ता. २४) सकाळी दहा ते दुपारी तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--
दहिवडच्या तरुणाचा
मोबाईल लंपास
मालेगाव ः दहिवड (ता. देवळा) येथील गणेश दिलीप आहिरे (वय २७) या चालकाचा ट्रकच्या कॅबीनच्या सीटवर ठेवलेला पंधरा हजारांचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. बुधवारी (ता. २४) रात्री अकराला सायने खुर्द शिवारातील रॉयल हॉटेलजवळ हा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
--
किरकोळ कारणातून
तरुणास मारहाण
मालेगाव ः कोठरे बुद्रुक (ता. मालेगाव) येथील सागर सुनील पवार (वय १७) याला शंकर बुवाजी पवार याने ‘तू माझ्या घरच्या मोबाईलवर फोन लावून माझ्या बाईला त्रास का देतो?’ अशी कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. सागरने त्याला ‘मी तुमच्या मोबाईलवर कॉल केलेला नाही. तुम्ही चेक करून घ्या’, असे बोलण्याचा राग येऊन शंकर व नीलेश अण्णू पवार (दोन्ही रा. कोठरे बुद्रुक) यांनी सागरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उचलून खाली जमिनीवर आपटून दिले. त्यात सागरच्या उजव्या हातास गंभीर मार लागून हात फ्रॅक्चर झाला. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---