बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ
शहरवासीयांनी लाभ घेण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २६ : महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभागाकडून एकल महिला नोंदणी अभियान आणि महिला बचत गट वस्तू विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर नसरीन खालिद शेख आणि आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. संगमेश्वर भागातील वीरशैव लिंगायत समाज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
महापौर नसरीन शेख यांनी आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून आयोजित या अभियानाचा आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आयुक्त जाधव यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त शासनाच्या उपक्रमांचा भाग म्हणून महात्मा फुलेंनी विधवा महिलांसाठी केलेल्या कार्याची जाणीव करून दिली. चाळीसगावच्या उद्योजिका मीनाक्षी निकम यांनी अनुभवकथन केले.
अमृत संस्थेच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनात बचत गटांच्या वस्तू, साड्या, खाद्यपदार्थ, मसाले आदींची विक्री ठेवण्यात आली असून, येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरही घेण्यात आले. तसेच ५ बचत गटांना कर्जाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती एजाज बेग, इस्लाम पक्षाचे गटनेते खालिद रशीद शेख, विरोधी पक्षनेते नीलेश काकडे, नगरसेवक दिनेश ठाकरे, दत्ता चौधरी, नगरसेविका राजश्री पाटील, अंजना दाभाडे, रिजवाना बी शेख सलीम, उपआयुक्त पल्लवी शिरसाठ, कर संकलन अधिकारी हेमलता डगळे, सहाय्यक आयुक्त दिनेश मोरे, प्रभाग अधिकारी सचिन महाले व जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे उपस्थित होते.
---