नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक
पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल; विनामोबदला काम करून घेतल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता. ३१ : टेहरे (ता. मालेगाव) येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कायमस्वरूपी शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थाचालक ज्ञानदेव पाटील व त्यांचा मुलगा प्रवीण पाटील यांच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात फसवणूक व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनामोबदला शिक्षकासह चालक व घरगडी म्हणून काम करून घेतल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी अमोल लक्ष्मण साळुंके (३८, रा. सोयगाव) यांनी फिर्याद दिली आहे. २०१५ मध्ये समता विद्यालयात शिक्षकपदावर नियुक्ती देण्याचे सांगून संस्थाचालक ज्ञानदेव पाटील यांनी त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर साळुंके यांना शाळेत इंग्रजी विषय शिकविण्याचे काम देण्यात आले; मात्र अधिकृत नियुक्ती आदेश देण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
२०१५ ते २०२४ या कालावधीत साळुंके यांच्याकडून विनामोबदला चालक व घरगडी म्हणून काम करून घेतल्याचे, तसेच विविध कार्यक्रमांमध्ये छायाचित्रणाचे कामही करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २०१९ मध्ये शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या नावाखाली आणखी ३० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये रिक्त पदे भरताना पुन्हा सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर जातीवाचक अपमान करण्यात आल्याचा आरोप साळुंके यांनी केला आहे.
२०२४ मध्ये वडिलांच्या आजारपणासाठी पैशांची गरज भासल्याने साळुंके यांनी नियुक्ती आदेश किंवा यापूर्वी दिलेली रक्कम परत मागितली. मात्र, संशयितांनी पैसे परत करण्यास नकार दिल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे आलेल्या मानसिक तणावातून वडिलांचा मृत्यू झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी छावणी पोलिस तपास करीत आहेत.