फोटो- 15799
सुर्यकांत देसले.
-----
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयोग करणारे सूर्यकांत देसले
-------------------------------
‘मॅजिक बॉक्स’द्वारे खेळ आणि शिक्षणाची सांगड घालण्याचा अभिनव प्रयोग
राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ४ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शिक्षकाने केवळ अभ्यासक्रम पूर्ण करून चालत नाही. त्यासाठी नवनवीन प्रयोग, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थ्यांप्रति आत्मीयता आवश्यक असते. हीच भूमिका प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारे देवारपाडे (ता.मालेगाव) येथील उपक्रमशील शिक्षक सूर्यकांत देसले हे प्रेरक ठरत आहेत.
श्री. देसले यांच्या अध्यापनाची सुरुवातच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून होते. परिपाठात दररोज सामान्य ज्ञानावर प्रश्नोत्तरे ते जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होते. सामान्य ज्ञानही समृद्ध होत आहे.त्यांच्या संकल्पनेतून शिक्षणाचा खेळकर अनुभव खेळ आणि शिक्षणाची सांगड घालण्याचा अभिनव प्रयोग म्हणजे ‘मॅजिक बॉक्स’. या उपक्रमात विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या काढायला दिल्या जातात आणि त्यावर असलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायची असतात. या खेळकर पद्धतीमुळे वर्गातील प्रत्येक विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतो. ‘शिकणे’ हा आनंदाचा अनुभव बनविण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर ते करतात. विद्यार्थ्यांना विषय सहज समजावा, अवघड संकल्पना सोप्या व्हाव्यात आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकता यावे, यासाठी ते विविध शैक्षणिक साहित्य तयार करून त्याचा अध्यापनात उपयोग करतात. त्यांच्या विज्ञान विषयक प्रयोगशीलतेची दखल घेत जिल्हास्तरावर घेतली आहे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये भाषिक गुणवत्तावाढीसाठी दररोज अर्धा तास शुद्धलेखनाचा सराव घेतात. यात विद्यार्थी स्वतः एकमेकांच्या वह्या तपासतात.या उपक्रमातून केवळ लेखनशुद्धी होत नाही, तर स्वतःच्या चुका स्वीकारून त्यातून शिकण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहे. सर्व सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने केवळ पुस्तकातील ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिकविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहभागातून परसबाग निर्मितीसह अनेकविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.