मालेगावात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत वाढ
मुख्य रस्त्यांची दुरवस्था; गणेशोत्सवापूर्वी डागडुजीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता. ८ : शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे. मोसम पूल सर्कल हा मुख्य वर्दळीचा मार्ग असून येथे खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, डांबरीकरण करून खड्डे बुजविण्याची गरज आहे. खडी पसरल्याने वाहनांचा वेग मंदावतो आणि परिणामी वाहतूक पोलिसांना कोंडी सोडविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
नावीन पुलाजवळ रस्त्यावरील धुळीचे मोठे लोट उठत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुले तसेच दुचाकीस्वारांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे. धुळीमुळे श्वसनाच्या त्रासाची शक्यता वाढल्याने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
चर्च गेट ते शनी मंदिर परिसरातही मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर बाजार भरत असल्याने या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होते. अर्धवट रस्ता तयार केल्याने सुमारे २५० फूट रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी वारंवार मागणी केली आहे.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात यापूर्वी विविध आंदोलने झाली आहेत. मोसम पुलावरील खड्ड्यात वृक्षारोपण, व्यापाऱ्यांचा बंद, ‘भीक मांगो’ आंदोलन तसेच वृत्तपत्रांतून रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मोसम पूल, सटाणा नाका, एकात्मता चौक, शनी मंदिर, चर्च परिसर, जिजामाता उद्यान आणि सोयगाव भागातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. आगामी गणेशोत्सव व सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांची डांबरीकरणाद्वारे तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.