पाईपलाईन फोडल्यावरून
दोन भावांमध्ये हाणामारी
मालेगाव : खडकी (ता. मालेगाव) येथे पाईपलाइन फोडल्याच्या कारणावरून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. योगेश भाऊसाहेब राजवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विठ्ठल नथू राजवंशी, अजय विठ्ठल राजवंशी, विजय विठ्ठल राजवंशी व राजेंद्र विठ्ठल राजवंशी (सर्व रा. खडकी) यांनी ‘पाईपलाइन कोणी फोडली?’ अशी विचारणा केली. योगेश यांनी ‘मला माहिती नाही’ असे सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली. यात हात-पाय व डोक्याला दुखापत झाली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या तक्रारीत विजय विठ्ठल राजवंशी यांनी खडकी बसस्थानकाजवळ योगेश भाऊसाहेब राजवंशी व यश योगेश राजवंशी यांनी विठ्ठल व विजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वनविभागाच्या चारीत
महिलेचा मृतदेह
मालेगाव : शिंदेवाडी लुल्ले येथे भाऊसाहेब सोनू गायकवाड यांच्या शेतालगत वन विभागाच्या चारीत सुमारे ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. लुल्ले येथील पोलिस पाटील भैय्या माळी यांनी याबाबत वडनेर खाकुर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.