बोरसे मृत्यूप्रकरणी शिक्षण विभागातील
नऊ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
पायऱ्यांवर कोसळून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा फिर्यादीचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ९ : येथील म्युनिसिपल हायस्कूलमधील शिक्षक सोपान खंडेराव बोरसे यांच्या मृत्यूप्रकरणी शिक्षण विभागातील अधिकारी व संबंधितांसह नऊ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशासकीय चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास देऊन, गुन्हा दाखल करण्याची धमकी देत अपमानित केल्यामुळे बोरसे यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडले आणि ते पायऱ्यांवर कोसळल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी बोरसे यांचे बंधू प्रवीण खंडेराव बोरसे (वय ४६, रा. वजीरखेडे) यांनी फिर्याद दिली आहे. शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर, शिक्षण उपसंचालक संजय राठोड, प्रशासक तथा गट शिक्षणाधिकारी तानाजी धोंडगे, नीलेश पाटोळे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
म्युनिसिपल हायस्कूलमध्ये मंगळवारी (ता. ८) शिक्षण विभागाचे पथक तपासणीसाठी आले होते. यावेळी नाशिकचे माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर, शिक्षण उपसंचालक संजय राठोड, म्युनिसिपल शाळेचे प्रशासक तानाजी धोंडगे आणि नाशिक येथील गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे यांनी शाळेतील कागदपत्रांची तपासणी केली. त्यापूर्वी दोन दिवस आधीही तानाजी धोंडगे यांनी शाळेची तपासणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
प्रशासकीय चौकशीच्या नावाखाली सोपान बोरसे यांना जाणूनबुजून त्रास देण्यात आला. त्यांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली तसेच अपमानित करण्यात आल्याचा आरोप प्रवीण बोरसे यांनी फिर्यादीत केला आहे. या मानसिक दडपणामुळे बोरसे यांचे स्वास्थ्य बिघडले. त्यांना चक्कर आली आणि शाळेच्या पायऱ्यांवरून पाय घसरून ते खाली कोसळले. चौकशी समितीसमोरच हा प्रकार घडल्यानंतर त्यांना तातडीने सहारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शिक्षण विभागाच्या पथकासमोरच शिक्षकाचा मृत्यू झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीतील संतप्त शिक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत शहर पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते. अखेर प्रवीण बोरसे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
धुळे येथे शवविच्छेदन
शिक्षक सोपान बोरसे यांचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांच्याकडे छावणी पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन होऊ शकले नाही. त्यानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, बोरसे यांच्यावर त्यांच्या मूळगावी वजीरखेडे येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक अपूर्व हिरे, शिक्षक, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.