फोटो -15868
रावळगाव : सुरक्षिततेसाठी स्वत:च्या वाहनाने वन विभागाच्या कार्यालयातून पिंजरा आणणारे शेतकरी.
----
बिबट्याला पकडण्यासाठी
शेतकऱ्यांनीच आणला पिंजरा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ११ : रावळगाव सेक्शन बी परिसरात आठवड्यापासून चार ते पाच बिबटे ठिकठिकाणी आढळले आहेत. बिबट्यांनी आतापर्यंत गायी, म्हशी, कुत्रे आदी जनावरांना ठार केले आहे. त्यामुळे परिसरात शेतमळ्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे अधिकारी या भागात येऊन गेले. मात्र त्यांनी पिंजरा लावला नाही. अखेर शेतकरी व ग्रामस्थांनी पुढाकार घेत वन विभागाच्या कार्यालयातून शेतकऱ्यांनी स्वत:च्या ट्रॅक्टरमधून पिंजरा आणून ताे परिसरात लावला.
रावळगाव सेक्शन बी परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत आहेत. वन विभागाचे अधिकारी या भागात आले. बिबट्याने ठार केलेल्या जनावरांचा पंचनामा केला. मात्र त्यांनी पिंजरा लावला नाही. पिंजरा आणायला आमच्याकडे वाहन नाही, अशा स्वरूपाची उत्तरे दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तर फोनही उचलत नाहीत अशा या भागातील शेतकरी व ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन सेक्शन बी येथील दिलीप जाधव, गोकुळ पवार, आनंद पवार, भास्कर पवार, नारायण पवार, दीपक पवार, संजय पवार, संदीप खैरनार आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत मालेगाव येथून स्वत:च्या वाहनाने पिंजरा आणला. तो या भागात लावण्यात आला. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी ग्रामस्थांना स्वतः पुढाकार घेऊन पिंजऱ्याची व्यवस्था करावी लागली. वन विभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला जेरबंद करावे. तसेच या भागात किमान एक पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांनी उचललेल्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.