अवजड वाहनांच्या वाहतुकीचा
अहवाल सादर करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १३ : कुसुंबा-मालेगाव रस्ता शहरातील द्याने-रमजानपुरा या दाट लोकवस्तीच्या भागातून जातो. या मार्गावर कमी टोल लागत असल्याने अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. गेल्या आठवड्यात या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले. अवजड वाहनांना शहरातून प्रवेश नाकारावा, अशी मागणी सामाजिक संघटनांसह इस्लाम पक्षाने केली आहे.
अपघातांची संख्या व नागरिकांच्या भावना लक्षात घेता निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कुसुंबा-मालेगाव मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.
कुसुंबा-मालेगाव हा मार्ग डोंगराळे, टिंगरी, दहिदी, करंजगव्हाण, वडगाव, द्यानेमार्गे रमजानपुरा, आयशानगर, नवीन बसस्थानक व मोसम पुलाच्या दाट लोकवस्तीमधून जातो. रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग सोयीचा झाला आहे. गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना साक्री-धुळे-मालेगाव मार्गावर अधिक टोल लागत असल्याने साक्री-कुसुंबा-मालेगाव या सुमारे ३० किलोमीटरच्या मार्गाचा वापर वाढला आहे. अवजड वाहनांची वाहतूक दाट लोकवस्तीतून होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. दरम्यान, कुसुंबाकडून येणारी अवजड वाहनांची वाहतूक करंजगव्हाणहून झोडगे मार्गे महामार्गावर वळविण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.