केबल ऑपरेटरची
पाच लाखांची फसवणूक
मालेगाव : संगमेश्वर भागातील केबल ऑपरेटर दिलीप तुकाराम भावसार (रा. सावतानगर) यांची अनोळखी व्यक्तीने बँक खाते व मोबाईलवर आलेले संदेश मिळवून ५ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केली. २४ ऑगस्टला भावसार यांनी फेसबुकवर त्यांच्या नावाचे अकाउंट उघडले असता त्यावर बँकेचे पेज दिसले. त्यावर क्लिक केल्यानंतर अनोळखी व्यक्तीने फोन करून नेट बँकिंग सुरू करण्याच्या नावाखाली खाते क्रमांक व मोबाईलवर आलेले संदेश विचारून घेतले. ३ सप्टेंबरला नेट बँकिंग तपासताना खात्यातील ५ लाख १६ हजार रुपये नसल्याचे निदर्शनास आल्यावर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विषारी औषध सेवनाने
दाभाडीत एकाचा मृत्यू
मालेगाव : दाभाडी (ता. मालेगाव) येथील सचिन अरुण पाटील (वय ४५, रा. लोंढानाला) यांनी १० सप्टेंबरला सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरी दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केले. त्रास जाणवू लागल्याने पत्नी कल्पना व नातेवाईकांनी त्यांना मातोश्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर १२ सप्टेंबरला सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
सातमाने भागात
डाळिंबांची चोरी
मालेगाव : सातमाने (ता. मालेगाव) येथील निलेश रवींद्र पवार यांच्या वडनेर शिवारातील शेतातून चोरट्यांनी ५० हजार रुपये किमतीचे ५०० किलो भगवा सेंदऱ्या जातीचे डाळिंब चोरून नेले. १० सप्टेंबरच्या सायंकाळी सहा ते ११ सप्टेंबरच्या सकाळी सव्वासातच्या दरम्यान ही चोरी झाली. याबाबत वडनेर खाकर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आठ क्विंटल
कांदा चोरीला
मालेगाव : कुकाणे (ता. मालेगाव) येथील सागर सोमनाथ लोंढे यांच्या कुकाणे शिवारातील शेतातून चोरट्यांनी २४ हजार रुपये किमतीचा आठ क्विंटल कांदा चोरून नेला. १ सप्टेंबरच्या सकाळी सात ते १२ सप्टेंबरच्या सकाळी पावणेसातच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी तेजस सुखदेव सोनवणे व अन्य एकाविरुद्ध वडनेर खाकर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भायगावातून
दोन गायींची चोरी
मालेगाव : भायगाव रस्त्यावरील लता योगेश सोनवणे यांच्या घराच्या पाठीमागे बांधलेल्या दोन गायी चोरट्यांनी चोरून नेल्या. त्यांची किंमत अनुक्रमे ३० हजार व ४० हजार रुपये असून, एकूण ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.