फोटो -15912
मालेगाव : संविधानातील भाग १६ मधील टिपू सुलतान यांचे तैलचित्र दाखविताना उपमहापौर शानेहिंद.
----
टिपू सुलतान तैलचित्र प्रकरणात
उच्च न्यायालयाने मागविले उत्तर
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १७ : महापालिकेत उपमहापौर शानेहिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे तैलचित्र लावल्यामुळे सुरुवातीला राज्यभर वादंग उठले हाेते. उपमहापौर यांच्या दालनाचे काम सुरू असल्याने त्यांनी तैलचित्र काढले होते. पुन्हा उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचे तैलचित्र लावल्याने शिवसेना, विश्व हिंदू परिषद तसेच हिंदुत्ववादी संघटनांतर्फे याचा निषेध करून आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी नगरसचिव व किल्ला पोलिसांनी उपमहापौरांना तैलचित्र काढण्यासंदर्भात नोटीस बजावली. त्या नोटिशीला आव्हान देण्यासाठी उपमहापौर शानेहिंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर बुधवारी (ता. १६) पहिली सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने महापालिका व किल्ला पोलिसांकडून म्हणणे मागितले आहे. आठवड्यात म्हणणे दाखल करावे, असे आदेश काढले असल्याचे उपमहापौर शानेहिंद यांनी येथे सांगितले. समाजवादीचे गटनेते मुश्तकीम डिग्निटी यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी शानेहिंद म्हणाल्या, की न्यायालयाने हा विषय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. पोलिस व महापालिकेचे म्हणणे दाखल झाल्यानंतर मलादेखील माझी बाजू मांडण्याची सूचना केली आहे. महात्मा गांधी व टिपू सुलतान यांच्यासह राष्ट्रपुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासाठी स्वतंत्र कायदा करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना विचारविनिमय करून लिहिले आहे. यात टिपू सुलतान यांचे तैलचित्र बनवले आहे. २८ सप्टेंबरला उपमहापाैर कार्यालय उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमहापौर शानेहिंद यांनी संविधानाची प्रत हातात घेत त्यामधील टिपू सुलतान यांचे तैलचित्र दाखविले. उच्च न्यायालयात शानेहिंद यांच्यातर्फे ॲड. एम. पी. वसीम यांनी बाजू मांडली आहे.