नांदगाव बुद्रुक दरोड्याप्रकरणी चौघांना अटक
जुन्या मजुरानेच साथीदारांसह टाकला दरोडा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १९ : नांदगाव बुद्रुक येथे मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री दरोडा टाकून तीन लाख ३७ हजार रुपयांचे सोने, मोबाईलसह साहित्य लंपास करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत मध्य प्रदेशातून अटक केली. यातील एक संशयित यापूर्वी घरमालकाकडे मजूर म्हणून कामाला होता.
दिताराम ऊर्फ ईलाराम मंत्री भार्या (वय ३०, रा. बगाड, जि. बडवाणी) हा वर्षभरापूर्वी नांदगाव बुद्रुक येथील प्रकाश गंगाराम सोनवणे यांच्याकडे कामाला होता. सोनवणे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती त्याला होती. त्यानुसार त्याने साथीदारांसह दरोड्याचा कट रचला.
दितारामसह ध्यानसिंग महकम खैर्य (वय ५०, रा. आंबापुरा), गंगाराम रुमालसिंग आर्य (वय ४५, रा. जलालाबाद) आणि राहुल रामसिंग दावर (वय ३०, रा. कुंदामल) या मध्य प्रदेशातील तिघांनी इको वाहनातून सोनवणे यांच्या घरावर दरोडा टाकला. घरातील सोने, मोबाईलसह तीन लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन त्यांनी पलायन केले. अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी तयार केलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संशयितांचा माग काढत पोलिसांनी चौघांना त्यांच्या घरातून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही सुरू होती. चौघांना गुरुवारी (ता. १७) सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले.
कामगारच संशयित
सोनवणे यांची शेती असून मजुरांची कमतरता असल्याने ते दरवर्षी मध्य प्रदेश आणि नंदुरबार जिल्ह्यातून मजूर आणतात. वर्षभरापूर्वी कृष्णा ऊर्फ दिताराम ऊर्फ ईलाराम मंत्री भार्या हा त्यांच्याकडे कामाला आला होता. त्याने साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.