सिटी महाविद्यालयात ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धा
नऊ विभागांत विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रकल्पांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २१ : येथील सिटी महाविद्यालयात शैक्षणिक संशोधन परिषदेअंतर्गत महाविद्यालयीन स्तरावरील ‘आविष्कार प्रकल्प संशोधन स्पर्धा २०२६’ उत्साहात झाली. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि शैक्षणिक आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
प्राचार्य प्रा. डॉ. मृणाल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन निमगाव महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अरुण पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी डॉ. आर. एस. भांबर उपप्राचार्य डॉ. आरिफ अंजुम यांनी ‘आविष्कार’ उपक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली.
‘‘आजच्या जनरेशन झेड पिढीतील विद्यार्थ्यांकडे नैसर्गिक प्रतिभा आहे. जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी आणि अर्थपूर्ण बदल घडविण्यासाठी अंगभूत कौशल्यांची सांगड आधुनिक एआय तंत्रज्ञानाशी घालणे काळाची गरज आहे,’’ असे प्रा. डॉ. अरुण पाटील यांनी सांगितले. स्पर्धेत अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, शेती व पशुपालन, मानसशास्त्र, विज्ञान, वैद्यकीय व फार्मसी, भाषा व मानव्यविद्या, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा अशा नऊ विभागांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उपप्राचार्य डॉ. शकीब अहमद व विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रा. फौझिया यांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण प्रकल्प तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रकल्पांचे मूल्यमापन बाह्य तज्ज्ञ परीक्षक डॉ. मनीष सोनवणे, डॉ. सय्यद हुमायूं अख्तर व डॉ. विजय शिवाजी मिस्त्री यांनी केले. शैक्षणिक संशोधन परिषदेच्या समन्वयक डॉ. हमदानी रिझवाना यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. संशोधक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.