पान एक मेन
15921
मालेगाव : कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसून आंदोलन करताना रामदास बोरसे व पदाधिकारी.
शहरातील अस्वच्छतेविरोधात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसून आंदोलन
महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर रामदास बोरसे आक्रमक; गणेश विसर्जन न करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १८ : गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेतर्फे शहरात योग्य प्रकारे स्वच्छता केली जात नाही. महाराष्ट्र मसाला ते किल्ला पोलिस ठाणे आणि शनि मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर सुतळी बारदाण तसेच कचरा तसाच पडून आहे. या भागातील गणेश मंडळांना व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या ''सार्वजनिक नागरी सुविधा समिती''चे रामदास बोरसे यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसून लाक्षणिक धरणे आंदोलन केले. शहरात योग्य स्वच्छता न झाल्यास गणेश विसर्जन करणार नाही, असा इशारा या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
महाराष्ट्र मसाला जवळील रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे; मात्र ठेकेदाराने रस्त्यावरील बारदाण तसेच सोडल्याने वाहनांच्या ये-जा मुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. रामसेतूवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि उर्दू लायब्ररीजवळ दुचाकी चाल घसरून अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा गंभीर अपघात होऊनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या मुख्य बाजारपेठेत धूळ व कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
डेंगीची साथ अन् फवारणीचा अभाव
शहरात सध्या डेंगी व इतर साथीचे आजार पसरले आहेत. तरीदेखील महापालिकेकडून डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात नसल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर रामदास बोरसे यांनी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच अस्वच्छतेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
--
तहसीलदारांना दिली ‘भीक मागो’ची रक्कम
आंदोलनस्थळी उपस्थित असलेले तहसीलदार विशाल सोनवणे यांना श्री. बोरसे यांनी स्वच्छतेसाठी ‘भीक मागो’ आंदोलनात जमा झालेले साडेअकराशे रुपये देण्याचा प्रयत्न केला; मात्र तहसीलदारांनी ते स्वीकारले नाहीत.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
आंदोलनाची दखल घेत महापालिका अधिकाऱ्यांनी कचरा उचलण्याचे काम सुरू केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष राहुल बच्छाव, शिवप्रतिष्ठानचे डॉ. चैतन्य देवरे यांच्यासह परिसरातील व्यापारी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.