टीपू सुलतान प्रतिमा प्रकरणी न्यायालयात प्रतिदावा
विहिंपचे शहरमंत्री श्याम देवरे यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २० : महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या दालनात टीपू सुलतान यांची प्रतिमा लावल्यावर निर्माण झालेला वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. प्रतिमा हटविण्याच्या कारवाईविरोधात उपमहापौरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात ॲड. साई अक्कर यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात प्रतिदावा दाखल करणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे शहरमंत्री श्याम देवरे यांनी दिली.
उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतान यांची प्रतिमा लावल्यानंतर देवरे यांनी आक्षेप घेत धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर ३१ ऑगस्टला नगरविकास विभागाने प्रतिमा हटविल्याचे पत्र देवरे यांना दिले होते.
उपमहापौरांच्या याचिकेत आपल्याला पक्षकार करण्यात आलेले नाही. त्यामुळे कायदेशीर हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतल्याचे देवरे यांनी सांगितले. शासनाच्या २००२ आणि १५ सप्टेंबर १९६५च्या परिपत्रकांत सार्वजनिक कार्यालयांत लावण्यात येणाऱ्या २४ राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमांची यादी असल्याचा दावा त्यांनी केला. या यादीत टीपू सुलतान यांचे नाव नसल्याने महापालिका कार्यालयात त्यांची प्रतिमा लावू नये, अशी भूमिका घेत प्रतिदावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उपमहापौरांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व संबंधित प्राधिकरणांना आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.