शेत न घेतल्याच्या रागातून खूनातील
अंबासन येथील आरोपीला जन्मठेप
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २१ : शेतजमीन खरेदी केली नाही, या रागातून हरी महिपत आहेर यांचा कोयत्याने वार करून खून केल्याचा आरोप सिद्ध झाला. याप्रकरणी अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी अंबासन (ता. सटाणा) येथील अभिमन्यू केदा बागुल (वय ५५) याला जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल.
२४ नोव्हेंबर २०११ ला सकाळी साडेदहाच्या सुमारास हरी आहेर हे घराबाहेर कुत्र्यांना पाव व बिस्किटे खाऊ घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी अभिमन्यू बागुल हातात कोयता घेऊन तेथे आला. दहा वर्षांपूर्वी आहेर यांनी आपली शेती खरेदी केली नाही. त्यामुळे शेती कमी किमतीत विकावी लागली आणि नुकसान झाले, अशी कुरापत काढून बागुलने आहेर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला.
त्यावेळी हरी आहेर यांची सून मोहिनी अनिल आहेर आणि नात प्राची संदीप पवार धावत आल्या. बागुलने त्यांच्या हातावर व बोटावरही कोयत्याने वार केले. त्यानंतर तो आहेर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर गेला आणि आतील दरवाजा बंद करून घेतला.
परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी हरी आहेर यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिकांत शिंदे यांनी बागुलला घरातून ताब्यात घेतले. मोहिनी आहेर यांच्या फिर्यादीवरून सटाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. अशोक पगारे व ॲड. संजय सोनवणे यांनी दहा साक्षीदार तपासले. ॲड. महेंद्र फुलपाखरे यांनी युक्तिवाद केला. आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने बागुलला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.