डोंगराळे बालिका हत्याकांडाचा ३० सप्टेंबरला निकाल

डोंगराळे बालिका हत्याकांडाचा ३० सप्टेंबरला निकाल
Published on
डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणाचा निकाल ३० ला मालेगाव, ता. २१ : डोंगराळे (ता. मालेगाव) येथील चार वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणात येथील न्यायालयात सोमवारी (ता. २१) सरकार पक्ष आणि संशयित आरोपीच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. दोन्ही बाजूंकडून कायदेशीर मुद्यांवर युक्तिवाद करण्यात आला. या खटल्याचा निकाल ३० सप्टेंबरला जाहीर होणार आहे. डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर २०२५ रोजी चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर विविध ठिकाणी आंदोलने व मोर्चे काढून संशयित आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले असून, त्यांच्या साक्षी तसेच उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर सरकार पक्ष आणि आरोपीच्या वतीने अंतिम युक्तिवाद करण्यात आला. सोमवारी झालेल्या अंतिम सुनावणीस ॲड. निकम तसेच आरोपीचे वकील व्हिडिओद्वारे उपस्थित होते. विशेष सरकारी वकील ॲड. संजय सोनवणे आणि मूळ फिर्यादीतर्फे ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे न्यायालयात उपस्थित होत्या. ॲड. निकम यांनी तोंडी युक्तिवादासोबत लेखी युक्तिवादही सादर केला. दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी ३० सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com