सावतावाडी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

सावतावाडी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन
Published on
वारंवार वीजखंडित होत असल्याने शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको काटवण परिसरात पिकांना पाणी देण्यास अडथळा; तीन तास वाहतूक विस्कळीत सकाळ वृत्तसेवा वडनेर, ता.२१ : पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात असतानाच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे काटवण परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी वडनेर, सावतावाडी, खाकुर्डी आणि काटवण परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २१) सायंकाळी सावतावाडी येथे सुरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तीन तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. काटवण परिसरात पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने खरीप पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विहिरी, कूपनलिका व अन्य सिंचन साधनांद्वारे पिकांना पाणी देण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित उपकेंद्राला सौरऊर्जा प्रकल्पातून वीजपुरवठा जोडण्यात आला आहे. सौरऊर्जा निर्मिती कमी झाल्यास शेतीसाठी पुरेसा पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने वारंवार वीजखंडित होत आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसून, तोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतीसाठी नियमित व सुरळीत वीजपुरवठा करावा, सौरऊर्जा निर्मिती कमी झाल्यास पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करावी, तसेच शेतीच्या वीजपुरवठ्याचे दोन सत्रांत नियोजन करून त्यात वारंवार खंड पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. रास्ता रोकोमुळे सुरत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीजप्रश्नी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी भाजपचे दिकपाल गिरासे, खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे, मनोज जैन, राजेंद्र चौधरी, शिवराज बच्छाव, सदाशिव चौधरी, माधव बोरसे, उमेश बच्छाव, राजेंद्र शेवाळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोट पावसाने आधीच साथ दिलेली नसताना वारंवार वीजखंडित होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. सौरऊर्जा निर्मिती कमी झाल्यास पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. अन्यथा तोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतीसाठी नियमित वीजपुरवठा करून दोन सत्रांचे योग्य नियोजन करावे. - दिकपाल गिरासे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, नामपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com