फोटो -15945
मालेगाव : चौघा संशयितांसह जप्त केलेले साहित्यासमवेत पोलिस अधिकारी
कामगारच निघाला दरोड्याचा सूत्रधार
मध्य प्रदेशातून चौघे जेरबंद; अन्य चौघे साथीदार अद्याप फरार
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २२ : नांदगाव बुद्रूक येथील घरावर दरोडा टाकणाऱ्या चौघांना तालुका पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत मध्य प्रदेशातून अटक केली. यातील एक संशयित यापूर्वी घरमालकाकडे मजुरीला काम करत होता. त्याने घरमालकाकडे मोठ्या प्रमाणात पैसा असल्याची माहिती साथीदारांना दिल्यानंतर आठ जणांनी मिळून दरोडा टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले. अटक केलेल्या चौघांकडून अडीच लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, मोबाईल व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित चार साथीदारांचा शोध सुरू आहे.
नांदगाव बुद्रूक येथील प्रकाश गंगाराम सोनवणे यांच्या घरावर मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री दरोडा पडला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून मध्य प्रदेशात पाठविले. पथकाने दीताराम उर्फ ईलाराम मंत्री भार्या (३०, रा. बगाड, जि. बडवाणी), ध्यानसिंग महकम खैर्य (५०, रा. आंबापुरा), गंगाराम रुमालसिंग आर्य (४५, रा. जलालाबाद) आणि राहूल रामसिंग दावर (३०, रा. कुंदामल) यांना अटक केली.
दीताराम हा वर्षभरापूर्वी सोनवणे यांच्याकडे कामाला होता. त्याला घरातील आर्थिक परिस्थितीची माहिती असल्याने त्याने ही माहिती साथीदारांना दिली. त्यानंतर आठ जणांनी सोनवणे यांच्या घरावर दरोडा टाकून ३ लाख ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल व अन्य साहित्य लंपास केले. अटक केलेल्या चौघांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश मानगावकर, निरीक्षक दत्ता शिंदे, राहूल मोरे, रघुनाथ शेगर, नितीन रणदिवे, दत्ता कांभिरे यांच्यासह पोलिस पथकाने केली. याबाबतची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.