पान चार
----------------------
09394
मनमाड : तक्रार बुकात तक्रार नोंदवताना खासदार भास्कर भगरे.
मनमाड रेल्वे प्रश्नांवरील बैठक रद्द
विभागीय रेल्वे व्यवस्थापक गैरहजर; खासदार भास्कर भगरे संतप्त
सकाळ वृत्तसेवा
मनमाड, ता. १५ : शहर व परिसरातील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शुक्रवारी (ता.१५) मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पुनीत अग्रवाल यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द करण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेवर खासदार भास्कर भगरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदविला. यावेळी उपस्थित नागरिक, व्यापारी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध करत बैठकीतून ''वॉकआऊट'' केले.
मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करणे, रेल्वे भूसंपादन, व्यापाऱ्यांच्या अडचणी, कामगार संघटनांचे प्रश्न आणि प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. खासदार भगरे यांच्या सूचनेनुसार भुसावळ विभागाचे डीआरएम पुनीत अग्रवाल स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बैठकीच्या वेळी ते अनुपस्थित राहिल्याने खासदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आम्हाला येथे काय भजे खायला बोलावले का? असा संतप्त सवाल विचारत त्यांनी रेल्वेच्या तक्रार पुस्तकात या प्रकाराबद्दल अधिकृत नोंद केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार भास्कर भगरे म्हणाले की, गोदावरी एक्सप्रेस ही नाशिक जिल्ह्याची जीवनदायिनी आहे. कोरोनाकाळात बंद केलेली ही गाडी पूर्ववत सुरू करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊनही मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नाही. सध्याच्या धुळे-मुंबई गाडीत प्रवाशांना जागा मिळत नाही, ज्यामुळे लासलगाव, निफाड आणि नाशिकच्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या बैठकीस अग्रवाल यांनी गैरहजर राहणे हा केवळ लोकप्रतिनिधीचाच नव्हे, तर समस्त मनमाडकरांचा अपमान आहे, अशी भावना खासदारांनी व्यक्त केली. या प्रकरणाची तक्रार थेट रेल्वेमंत्र्यांकडे करून चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ॲड. सुधाकर मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक सुनील पाटील,अशोक व्यवहारे, अजय खरोटे, नरेंद्र कांबळे, कृष्णा पगारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक, एस. एम. भाले, कल्पेश बेदमुथा आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.