(पान ४ ला ॲंकर)
MSI26B09486
रोहोड (ता. साक्री) : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत रानभाजी महोत्सवात भाज्यांचे निरक्षर करताना मान्यवर. (छायाचित्र : जगदीश कडवे)
--------------
रानभाजी महोत्सवातून पारंपरिक आहाराचे महत्व अधोरेखीत
रोहोड आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. १ : रोहोड (ता. साक्री) येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना पारंपरिक आहारपद्धती, स्थानिक जैवविविधता तसेच रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व समजावे, या उद्देशाने नुकताच रानभाजी महोत्सव घेण्यात आला.
रोहोडच्या सरपंच कल्पनाताई किरण राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मुख्याध्यापक प्रशांत तायडे अध्यक्षस्थानी होते. माध्यमिक शिक्षक सुरेश देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी रानभाज्यांचे पारंपरिक महत्त्व, स्थानिक जीवनशैलीतील त्यांचे स्थान तसेच बदलत्या आहारपद्धतीच्या पार्श्वभूमीवर रानभाज्यांचे जतन करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
विविध रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन
महोत्सवात शाळेच्या परिसरासह आजूबाजूच्या भागात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेत त्यांचे स्वरूप, उपयोग तसेच पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पाककृतींची माहिती घेतली. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ प्रदर्शनापुरता मर्यादित न ठेवता काही निवडक रानभाज्या प्रत्यक्ष बनवून विद्यार्थ्यांना त्यांचा आस्वाद देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना रानभाज्यांची चव, पाककृती आणि आहारातील महत्त्व यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
पौष्टिक घटकांची दिली माहिती
महोत्सवादरम्यान विविध रानभाज्यांमध्ये असलेले पौष्टिक घटक, जीवनसत्त्वे, खनिजे आणि त्यांचे आरोग्यासाठी असलेले फायदे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परिसरात सहज उपलब्ध असलेल्या या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर करून पारंपरिक आणि सकस आहारपद्धती जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. प्रा. जगदीश कोकणी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राजाराम गायकवाड यांनी आभार मानले.