(पान ४ ला मेन)
MSI26B09497
धुळे : ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रितम काळे यांना निवेदन काळगाव येथील शेतकरी व ग्रामस्थ.
------------------
काळगावात वीजेचा लपंडाव; आमरण उपोषणाचा इशारा
-
वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे ग्रामस्थांची शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. ५ : साक्री तालुक्यातील शेवटच्या टोकाला चौफेर वनक्षेत्र असलेल्या काळगाव (ता. साक्री) येथे पूर्वीची सिंगल फेज वीज पुरवठा योजना नियमित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पिंपळनेर विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रितम काळे यांच्याकडे निवेदन देत रोष व्यक्त करण्यात आला आहे.
-
छाईल (ता. साक्री) येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून गावासाठी वीज पुरवठा होतो परंतु स्वतंत्र गावठाण फिडर कार्यन्वित नसल्याने वीजेचा खेळखंडोबा सुरू आहे. गावात गेल्या पंधरा दिवसांपासून शेतीसाठी आठ तास व उर्वरित वेळ सिंगल फेज पुरवठा होतो. मात्र, दर दहा ते पंधरा मिनिटांनी वीज खंडित होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. नव्वद टक्के बागायती फळशेती असलेल्या या भागात पुरेशी वीज मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच, वीज पुरवठ्याअभावी परिसरातील मोबाईल टॉवरही बंद पडले असून, शून्य भारनियमन तत्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. गावाची लोकसंख्या एक हजार ९३ असून, ४१० हेक्टर महसूल क्षेत्र व एक हजार ३२० हेक्टर विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. गावात सुमारे २१२ शेतकरी कुटुंबे वास्तव्य करतात.
-
हिंस्त्र प्राण्यांची भीती
गावाला लागून चौफेर वनक्षेत्र असल्यामुळे रात्रीच काय पण दिवसादेखील बिबट्या व तरस यांसारख्या हिंस्त्र वन्य प्राण्यांचा वावर असतो. यामुळे शेतकरी व ग्रामस्थ कायम भयभीत वातावरणात असतात. रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित असल्यास शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येत असल्याने प्रशासनाचे आश्वासन पोकळ ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास १४ सप्टेंबरपासून ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तत्कालीन सरपंच संजय भामरे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजधर देसले, लोटन ठाकरे, गंगाराम ब्राह्मणे, हेमराज ठाकरे, प्रमोद ठाकरे, बाजीराव ठाकरे, नितीन ठाकरे, नवल ठाकरे, रावसाहेब खैरनार, रावसाहेब ठाकरे, विनायक खैरनार, भाऊसाहेब ठाकरे, भैय्या खैरनार, बंटी ठाकरे आदींनी निवेदन दिले. अभियंता कांबळे उपस्थित होते.