(पान ४ ला मेन)
वीज ट्रिपिंगने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी!
दीड महिन्यापासून पावसाची दडी; विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येईना
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. ६ : साक्री तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेत- शिवारातील पिके करपून गेली आहेत. दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पुरेशा वीजपुरवठ्याअभावी विहीरींना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करा, अशी मागणी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
-------
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरीश विश्वासराव नेरकर यांनी निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, उप-अभियंता, तहसीलदार आदींना देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील काटवान, कान परिसर, माळमाथा, पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात शेतीचा विद्युत पुरवठा सुरळीत नाही. विजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने वीज पंप, रोहित्र जळण्याचे प्रकार वाढले आहेत. कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने कृषी पंपाच्या पाण्याचे प्रेशर कमी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंडासह मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. अस्मानी, सुलतानी अशा दोन्ही संकटांशी शेतकरी संघर्ष करीत आहे. एकीकडे धरणे शंभर टक्के भरले असून, दुसरीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांना तोंडाला पाणी पुसण्याची वेळ आली आहे. ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पांझरा- कान दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत असतानाही सदर पाण्याचा साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. पाटबंधारे विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून, सूचना करूनही सदर कॅनॉलमधून पाणी सोडले जात नाही. विविध प्रकारची कारणे नेहमीच त्यांच्या तोंडी ऐकायला मिळतात, ही खेदाची बाब आहे. तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी- कर्मचारी जेव्हा सर्वसामान्य नागरिक फोन करतो तेव्हा फोन घेत नाहीत. यामुळे सर्वसामान्य लोकांना तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. जे अधिकारी- कर्मचारी फोन उचलत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. वेळेवर फोन उचलला गेला तर समस्या वेळेवर सुटू शकते, अशी भावना शेतकऱ्यांची आहे.
वारंवार निवेदन देण्याची दुर्दैवी वेळ
वारंवार त्याच- त्याच विषयावर निवेदने, आंदोलने करूनही प्रशासन दखल घेत नसेल तर त्यांना योग्य मार्ग आता जनता दाखवेल. तालुक्यातील शेत-शिवारातील पिकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पिके वाळून जात आहेत. थोड्याफार प्रमाणात विहिरींना पाणी असल्याने शेतकरी सदर पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जातो,तेही रात्रीच्या वेळेस. आठ तासाची वीज दोन तास सुद्धा मिळत नाही. तीही दहा- वीस मिनिटांच्या ट्रिपिंगने वारंवार खंडित होत असते. या सर्व प्रकारामुळे शेतकरी पूर्णपणे वैफल्यग्रस्त व हतबल झालेला आहे.