(पान ४ ला सेकंड मेन)
MSI26B09521
साक्री : महावितरणच्या भोंगळ कारभाराविषयी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ.
--------
भारनियमनाच्या नावाखाली बत्ती गुल!
शिवसेनेचे साक्रीतील महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. ७ : साक्री तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कृषिपंपाच्या वेळापत्रकानुसार वीज मिळत नाही. सिंगल फेज लाईट रात्रीची मिळत नाही. दिवसा कृषिपंप चालत नाही. अत्यावश्यक भारनियमनाच्या नावाने रात्रभर बत्ती गुल असते. अशा वेळी वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) सकाळी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विशाल देसले व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाने मोठी ओढ दिली असताना महावितरण शेतकऱ्यांना सहकार्य करीत नसल्याचे चित्र आहे. विजेसंदर्भात संपर्क साधल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाही. अधिकारी, कर्मचारी फोन बंद करुन कोणतेही कारण नसतांना शेतकऱ्यांना त्रास देत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी तहसीलदारासमोर मांडली. विहिरीत शिल्लक असलेले पाणी पिकांना देण्यासाठी विज वितरण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे उभे पीक वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वेळेप्रमाणे वीज मिळत नाही म्हणून कृषिपंप चालत नाही. आठ तासात सलग चार तासही वीज मिळत नाही. रात्री सिंगल फेज वीजपुरवठा न करता अत्यावश्यक भारनियमनाच्या नावाने फसवले जाते. रात्री जंगलात हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. तालुक्यात सौर उर्जा प्रकल्प असूनही शेतकऱ्यांना वीज पुरवठाठ्यासाठी निवेदन द्यावे लागत असल्याची चर्चा आहे. येत्या आठ दिवसात महावितरण विभागास सूचना करुन दिवसा कृषिपंप व रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सुरत- नागपूर महामार्ग रास्तारोको करुन पूर्णपणे बंद करण्यात येईल. शिवाय, महावितरणच्या कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, पोलिस निरिक्षकांना देण्यात आल्या आहेत. या वेळी कासारे येथील माजी सरपंच सुभाष देसले, दीपक खैरनार, मुकेश पाटील, हेमराज शिंदे, गोकूळ राजपूत, अविनाश खैरनार, अविनाश मोरे, सोमनाथ राजपूत, अविनाश बोरसे, तुषार देवरे, भालचंद्र देवरे, दीपक मोरे, नंदू मोरे, भूषण शिंदे, महेंद्र कुवर, विनोद शिंदे उपस्थित होते.