प्रा. युवराज काकूस्ते : MSI26B09530
---------
सोळा काटवान भागातील गावे तहानलेलीच
लाटीपाडा धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. १० : पांझरा नदीचे पाणी लाटीपाडा धरणातून ओव्हरफ्लो होत असताना धरणाच्या उजव्या कालव्यातून नियोजनपूर्वक पाणी सोडल्यास काटवान भागातील सोळा- काटवान गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. शेतकरी दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जात असून, शेतीपिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांना पाणी देण्याऐवजी पाटबंधारे विभागाकडून कर्मचारी नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. युवराज काकूस्ते यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून लाटीपाडा धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून उजव्या कालव्यातून काटवान भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी केली. मात्र, विभागाकडून कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. विशेष म्हणजे, ‘कर्मचारी नसतील तर पाटचारीवर माणसे आम्ही स्वखर्चाने लावून देतो’, असेही संघटनेच्या वतीने विभागाला सांगण्यात आले. तरीदेखील पाटबंधारे विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी केवळ काही गावांपुरते मर्यादित न ठेवता विटाई गावापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी मागणी धनराज गांगुर्डे, भूषण गांगुर्डे, अमोल ठाकरे (प्रतापपूर), पराग कुवर (छाईल), राजू अहिरराव, डॉ. शिवाजी भामरे, मयूर अहिरराव (दिघावे), संतोष भामरे (नाडसे), ॲड. युवराज तोरवणे, शहाजी तोरवणे (बेहेड), संदीप भामरे (दारखेल) यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
--------------
पाटबंधारे विभागाने तातडीने उजव्या कॅनॉलमधून पाणी सोडण्याचे नियोजन करून काटवान भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा पाटबंधारे विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात प्रा. युवराज काकूस्ते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.
- हर्षल ठाकरे, युवक तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना