MSI26B09572
दिघावे (ता. साक्री) : शिवारात उजव्या कालव्याची दुरुस्ती करताना शेतकरी.
-----------------
लाटीपाडा प्रकल्पाचे पाणी काटवान परिसरात
उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. १६ : यंदा अत्यल्प पावसामुळे साक्री तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नाले, बंधारे आणि विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लाटीपाडा प्रकल्पाचे पाणी पांझरा नदीतून ओव्हरफ्लो होत असतानाही काटवान परिसराला पाण्याची प्रतीक्षा होती. अखेर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन लाटीपाडा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून काटवान परिसरात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रा. युवराज काकूस्ते यांच्यासह काटवान परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचबरोबर निळगव्हाण व दारखेल येथील सोळा तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत उजव्या कालव्यातील घाण व गाळ साफ केला. त्यामुळे कालव्यातून पाणी पुढे नेण्याचा मार्ग मोकळा झाला असून हे पाणी विटाईपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. काटवान परिसरातील गंभीर पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रा. युवराज काकूस्ते यांनी देशशिरवाडे रस्त्याचे काम बंद करण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला. कालव्याचे पाणी परिसरातील शेतांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावे यासाठी त्यांनी पदरमोड करून पाटचारी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत निळगव्हाण, दारखेलसह परिसरातील युवक व शेतकरी मदतीला धावून आले. त्यांच्या श्रमदानातून कालव्याचे पाणी काटवान भागात पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला.
पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता
लाटीपाडा प्रकल्पाचे पाणी देशशिरवाडे ते विटाई परिसरासह गणेशपूर व कासारे गावांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. कालव्यात पाणी आल्यामुळे परिसरातील नाले, बंधारे आणि विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच आगामी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांसाठी हे पाणी उपयुक्त ठरणार आहे. वेळेत पाणी उपलब्ध झाले नसते, तर काटवान परिसरातील अनेक विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता होती. परिणामी, शेतीच्या पाण्यासोबतच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अधिक गंभीर झाला असता. मात्र, कालव्यातून पाणी परिसरात पोहोचल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या कामासाठी हर्षल ठाकरे, पराग कुवर, शशी देसले तसेच अधिकारी दुसाने, कापडणीस, जाधव आदींनी सहकार्य केले.
---------------
सोळा शेतकऱ्यांचे श्रमदान
दरम्यान, शेतकरी एकत्र आले तर काही करू शकतात. निळगव्हाण, दारखेल व परिसरातील सोळा पेक्षा अधिक शेतकरी एकत्र आल्याने पाटचारी साफसफाई करण्यात आले. घाण, कचरा काढल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग सुकर झाला. उजव्या कालव्याचे पाणी विटाईपर्यंत येईपर्यंत शिस्त पाळावी, असे आवाहन प्रा. काकूस्ते यांनी केले आहे.
----------
शेतीच्या विजेचा प्रश्न हाती
पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता काटवान परिसरातील शेतीच्या विजेचा प्रश्न हाती घेणार असल्याची माहिती प्रा. काकूस्ते यांनी दिली. शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर तातडीने तोडगा निघाला नाही, तर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.