(पान ४ ला मेन)
MSI26B09605
साक्री : सी. गो. पाटील महाविद्यालयात रेशीम शेती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना चंद्रजित पाटील. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. आंनद पाटील, डॉ. राजेंद्र देवरे.
---------------
रेशीम शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे
चंद्रजीत पाटील : एकदिवसीय कार्यशाळेचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. २२ : रेशीम उद्योग हा शेतीपूरक, शाश्वत, नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय असून, तो छोट्या स्तरावरही यशस्वीपणे करता येतो. शासनाच्या विविध योजनांद्वारे रेशीम शेतीसाठी अनुदान व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून या व्यवसायाचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन साक्री येथील विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील यांनी केले.
---------
साक्रीत सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘रेशीम शेती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ पद्माकर चंद्रभान कुंदे, प्राचार्य डॉ. लहू पवार, बळसाणे येथील सरपंच ज्ञानेश्वर हलोरे, प्राचार्य डॉ. अनंत पाटील, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर चव्हाण, प्रा. युवराज काकुस्ते यांच्यासह साक्री तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
चंद्रजीत पाटील यांनी साक्री परिसरातील अधिकाधिक शेतकरी रेशीम शेतीकडे वळल्यास स्थानिक पातळीवर रेशीम उत्पादनाबरोबरच त्यावर आधारित प्रक्रिया व मूल्यवर्धित उद्योगांना चालना मिळू शकते. त्यातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल. रेशीम उद्योग देशाच्या आर्थिक विकासातही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकत असल्याचा विश्वास व्यक्त केला. प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी रेशीम शेती हा दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणारा शेतीपूरक व्यवसाय असल्याचे सांगितले.
द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. लहू पवार यांनी ‘सिल्क मिशन २०३६’ तसेच ‘साक्री तालुक्यातील एकात्मिक, शाश्वत आणि मूल्यवर्धित रेशीम शेती विकास आराखडा’ या विषयांवर मार्गदर्शन केले. तुतीच्या वाणाची निवड, तुतीची लागवड व व्यवस्थापन तसेच रेशीम अळ्यांचे संगोपन याबाबत त्यांनी माहिती दिली. द्वितीय सत्रात सरपंच ज्ञानेश्वर हलोरे यांनी रेशीम शेती करताना आलेले आपले प्रत्यक्ष अनुभव उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडले. रेशीम अळ्यांचे संगोपन, त्यांची योग्य काळजी, आवश्यक व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष शेतीतील अनुभव सांगत त्यांनी शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी प्रोत्साहित केले. समारोपप्रसंगी प्राचार्य राजेंद्र अहिरे अध्यक्षस्थानी होते. बी. एम. भामरे, सरदार पाटील, प्राचार्य डॉ. आनंद पाटील, उपप्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रदीप राठोड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विलास पावरा यांनी आभार मानले.
-----------
रेशीम उद्योग हा शेतीपूरक, शाश्वत उत्पन्नाचा प्रभावी पर्याय असल्याचे सांगितले. इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत रेशीम शेतीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळविण्याची क्षमता असून, योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास कमी क्षेत्रातही हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
- डाॅ. पद्माकर कुंदे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा