टीईटी परीक्षेसाठी बुरखा,
दुपट्ट्याचे स्वातंत्र्य
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. २४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या रविवारी (ता. २८) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) राज्यातील सुमारे सहा लाखांहून अधिक विद्यमान, भावी शिक्षक देणार आहेत. परीक्षेसाठी महिला परीक्षार्थीना नवीन आदेशाद्वारा कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी, बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे; परंतु परीक्षेच्या वर्गखोलीमध्ये परीक्षार्थीचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे.
कान, डोके, चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कपडा, आवरण असता कामा नये, असे परीक्षा परिषदेने आदेशात स्पष्ट केले आहे. टीईटी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने यापूर्वी जाहीर केलेल्या नियमावलीत दुपट्टा, बुरखा, टोपी वापरता येणार नसल्याचे सांगितले होते. परंतु, महिला परीक्षार्थीना बुरखा, हिजाब, दुपट्टा वापरण्यास परवानगी देण्याबाबतची मागणी राज्यातील विविध शिक्षक संघटनाच्या माध्यमातून परीक्षा परिषदेकडे करण्यात आली होती.
उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा संदर्भ देत परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ''यूपीएससी'', स्टाफ सिलेक्शन कमिशन, ''सीए'', ''सीएस'', ''एमपीएससी'' अशा विविध स्तरावरील परीक्षांमध्ये चेहरा झाकणारे दुपट्टा, बुरखा, स्कार्फ, टोपी, गॉगल यांना प्रतिबंध केल्याची माहिती दिली आहे. परीक्षावेळी चेहऱ्यावर हिजाब, बुरखा, दुपट्टा यावर बंदी घालण्यामागे परीक्षा कालावधीत उमेदवारांवर बारकाईने लक्ष ठेवून गैरप्रकार रोखणे, ओळख पडताळणी करणे, परीक्षेची पारदर्शकता, विश्वासार्हता कायम ठेवण्याचा उद्देश आहे, असेही परीक्षा परिषदेतर्फे सांगण्यात आले.