दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
नांदगावला आज आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १७ : तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (ता.१८) आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत विविध विभागांची आढावा बैठक होत आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्यासह विविध खातेप्रमुख या बैठकीस उपस्थित राहणार आहे.
दोन वर्षांपूर्वी नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नांदगावचा समावेश झाला नव्हता. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरच्या निष्कर्षांच्या आधारे दुष्काळी स्थितीचे मूल्यांकन करण्यात आले होते. मात्र, नंतर मदत व पुनर्वसन विभागाचे पत्र समोर आल्यानंतर नांदगावचा यादीत समावेश नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘दुष्काळाच्या यादीतून नांदगाव गायब कसे झाले0’ हा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी कृषी, महसूल, भूजल सर्व्हेक्षण, ग्राम विकास विमा कंपनी यांच्याकडून आढावा घेणे सुरु केले आहे.
यंदा अत्यल्प पाऊस, २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड, भूजल पातळीत घट, पिकांच्या क्षेत्रात व अपेक्षित उत्पादनात मोठी घट, पिकांचे नुकसान, चाऱ्याची टंचाई तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.