पान एक सेकंड मेन
---------------
11067
नांदगाव : दुष्काळ आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सुहास कांदे शेजारी नगराध्यक्ष सागर हिरे, शीतल घोलप, सुनील सैंदाणे, किसन खाताळे, रवींद्र डमाळे, फरहान खान आदी.
दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे सतर्क रहा
आमदार सुहास कांदे : पाणी, चारा व पीक नुकसानीचा घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १८ : तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ‘अलर्ट मोड’ वर राहावे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा आणि शेतीच्या नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार सुहास कांदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदगावला सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी सूचना देत प्रशासनाला संभाव्य टंचाई व संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता आणि खरीप पिकांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असल्यास प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीनुसार तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार कांदे यांनी दिल्या.
परिस्थिती बिकट झाल्यास नागरिक व शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी महसूल, कृषी, ग्रामविकास आणि नगरपरिषद प्रशासनाने आपापसांत तीव्र समन्वय ठेवावा, असे बजावण्यात आले. तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी प्रशासन पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक उपाययोजनांचे आगाऊ नियोजन सुरू असल्याची माहिती दिली.
बैठकीस उपविभागीय अधिकारी शीतल घोलप, तहसीलदार सुनील सैंदाणे, गटविकास अधिकारी किसन खाताळे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे, नगराध्यक्ष सागर हिरे, मुख्याधिकारी श्यामकांत जाधव, मनमाडचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, शिवसेनेचे फरहान खान यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------
एकही शेतकरी होरपळला जाता कामा नये
दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीत तालुक्यातील एकही शेतकरी होरपळला जाता कामा नये. उपाययोजनांमध्ये कोणतीही कमतरता किंवा प्रशासनाचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा आमदार कांदे यांनी दिला. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि पशुधनावर विपरीत परिणाम होण्यापूर्वीच आवश्यक ती पावले उचलण्याचे त्यांनी निर्देश दिले.