(पान ४ ला ॲंकर)
NGL26B04060
दोंडाईचा : येथील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिष्यवृत्ती वाटप करताना बापूसाहेब रावल, रघुवीर बागल, महेंद्र पाटील, नारायण पाटील व संघाचे पदाधिकारी.
------------
दूध संकलन वाढल्यास संघाचा कारभार बळकट
बापूसाहेब रावल : दूध उत्पादक सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
निमगूळ, ता. १९ : दूध उत्पादक सभासदांच्या पाल्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी १२ लाख रुपयांपेक्षा अधिक शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. ही योजना आजही सुरू आहे. संघाकडे सध्या दूध संकलन कमी आहे. त्यामुळे दूध उत्पादकांनी संघाला अधिकाधिक दूध पाठवावे. दूध संकलन वाढल्यास संघाचा कारभार बळकट होण्यासोबतच दूध उत्पादकांना चांगला भाव मिळण्यास मदत होईल. संघाला दूध देणाऱ्या सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभही पुढे मिळत राहील, असे प्रतिपादन माजी आमदार बापूसाहेब रावल यांनी केले.
दोंडाईचा येथील दादासाहेब रावल शिंदखेडा तालुका कृषिपूरक उद्योग सहकारी संघाची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या आवारात खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी दादासाहेब रावल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दूध उत्पादकांनी संघाला अधिकाधिक दूध पुरवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सभेला संघाचे अध्यक्ष रघुवीर बागल, उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक आनंदा पाटील, किशोर पाटील, नारायण पाटील, गुलाबराव पाटील, दिनेश चोळके, ललित गिरासे, दिलीप धनगर, रवींद्र भील, सतीश पवार आदी उपस्थित होते. प्रभारी व्यवस्थापक दीपक शिसोदे यांनी संचालक मंडळाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक तसेच व्यापारी पत्रक सभेसमोर वाचून दाखविले. सभासदांनी त्यास मंजुरी दिली. यावेळी तालुक्यातील दूध उत्पादक सभासदांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. प्रभारी व्यवस्थापक दीपक नारायण शिसोदे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी आभार मानले.