(पान ४ ला मेन)
NGL26B04069
दोंडाईचा : येथील पृथ्वी फाउंडेशनतर्फे मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करतांना पद्मश्री चैत्राम पवार, केदारनाथजी कवडीवाले, कैलास जैन, पराग पंचभाई आदी.
-----------
भावी पिढी जपणे म्हणजेच शाश्वत विकास
पद्मश्री चैत्राम पवार : ‘पृथ्वी मोलाची फाउंडेशन’तर्फे पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
निमगूळ, ता. २१ : विकास साधताना निसर्ग, स्थानिक समाज आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा समतोल राखणे आवश्यक आहे. आजच्या गरजा पूर्ण करताना त्याचा भावी पिढीच्या गरजांवर विपरीत परिणाम होणार नाही, याची जाणीव ठेवणे म्हणजेच शाश्वत विकास होय, असे प्रतिपादन पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले.
दोंडाईचा येथील पृथ्वी मोलाची फाउंडेशनतर्फे हस्ती पब्लिक स्कूलमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. निसर्ग, जल, जंगल, शाश्वत शेती, वन्यजीव संरक्षण आणि समाजाच्या सहभागातून विकास या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा या वेळी गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पद्मश्री चैत्राम पवार होते. प्रमुख वक्ते म्हणून जळगाव विद्यापीठाचे सिनेट सदस्य केदारनाथजी कवडीवाले, तसेच हस्ती बँकेचे अध्यक्ष कैलास जैन उपस्थित होते.
फाउंडेशनतर्फे यंदाचा विशेष ‘बिल्वपत्र पुरस्कार २०२६’ अक्कलकोस (ता. शिंदखेडा) येथील ग्रामविकास समितीला प्रदान करण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून जलसंवर्धन व पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. धुळे येथील गोल्डन अर्थ बायोप्रीझर्व्ह संस्थेला वन्यजीव संरक्षण, स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, नैसर्गिक अधिवासांचे जतन आणि पर्यावरण शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सुराय (ता. शिंदखेडा) येथील विश्वमाता गौशाळेला गोसंवर्धन, देशी गोवंशाचे संरक्षण, पशुकल्याण आणि गोआधारित पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी गौरविण्यात आले.
दोंडाईचा येथील सर्पमित्र दीपक संजय धनगर यांना सर्पसंरक्षण व वन्यजीव बचावकार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. मोहगाव (महुपाडा, ता. साक्री) येथील चंद्रकलाजी गावित यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून आत्मविश्वासाचा संदेश दिल्याबद्दल त्यांना ‘पृथ्वी सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील कृष्णाजी कडूबा झलवार यांचा शाश्वत शेती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धतींच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रफुल्ल साळुंखे, प्रणाली पंचभाई, गोपाल पंचभाई, ॲड. आदित्य आयाचित, ॲड. नितीन आयाचित, कपिल सोनार, तुषार बागल, निखिल देवरे, गोकुळ पारधी यांच्यासह दोंडाईचा परिसरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पराग पंचभाई यांनी आभार मानले.
केदारनाथजी कवडीवाले म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी व्यापक लोकसहभागाची गरज आहे. पर्यावरण संवर्धन केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न ठेवता जलसंवर्धन, जंगलांचे संरक्षण, जैवविविधता, स्थानिक संसाधनांचे जतन, पर्यावरण शिक्षण आणि स्थानिक समुदायांचा सहभाग या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे.
‘शाश्वत विकास अनुसंधान मंचा’चे अनावरण
दोंडाईचा परिसरातील पर्यावरण व शाश्वत विकासाच्या विषयांवर काम करण्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांनी स्थापन केलेल्या ‘शाश्वत विकास अनुसंधान मंचा’चे अनावरण पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दोंडाईचा व परिसरातील स्थानिक पर्यावरणीय प्रश्नांचा अभ्यास, संशोधन, नवकल्पना, स्थानिक उपाययोजना आणि युवकांचा सक्रिय सहभाग यांना चालना देणे हा मंचाचा उद्देश आहे.
----------
संस्थेतर्फे दरवर्षी पर्यावरण शाश्वत शेती वृक्ष संवर्धन वननिर्मिती व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान केला जातो. त्यातून अजून अधिक काम करण्याची क्षमता येत असते, याचाच मनस्वी आनंद आहे.
- पराग पंचभाई, संचालक, पृथ्वी फाउंडेशन, दोंडाईचा
---------