महावितरणकडून ''मेसेज''चा पाऊस
सुकेना लाईनच्या ''ब्रेकडाऊन''मुळे शेतकरी हवालदिल!*
-------------
सकाळ वृत्तसेवा
म्हाळसाकोरे, ता.१४ ः उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या तामसवाडी, करंजी, तारूखेडले या भागात विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. अनेक दिवसांपासून या परिसरातील ''सुकेना लाईन'' सातत्याने ब्रेकडाऊन होत असल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. महावितरणच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर रोज नित्यनियमाने एकच मेसेज येतो तो म्हणजे,‘सुकेना लाईन ब्रेकडाऊन असल्यामुळे वीज पुरवठा मिळण्यास विलंब होईल, तसदीबद्दल क्षमस्व.’ रोजचे तेच कारण आणि तोच मेसेज पाहून आता ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वादळी वारा कालपासून सुरू झाला असला तरी, त्याआधीपासूनच सुकेना लाईनचा तांत्रिक बिघाड शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. वीज कधी येणार याचे कोणतेही ठोस वेळापत्रक नसल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. महावितरणकडून फक्त मेसेजचा पाऊस पाडला जातो, मात्र प्रत्यक्ष वीज गायबच असते, अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
परिस्थितीबाबत वायरमनशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की कालपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब (पोल) पडले आहेत. त्याचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून त्यामुळे आजचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र, केवळ वादळाचे कारण न देता सुकेना लाईनचा मूळ प्रश्न कायमस्वरूपी का सुटत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. विजेचा हा ''वनवास'' नेमका कधी संपणार? असा प्रश्न दत्ता आरोटे व गोदाकाठ परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
-----------------