पान-३ मेन
---------------
जिल्ह्यात ६२१ गावात प्रशासक मुदत समाप्त
-----------
गावगाडा कोण हाकणार हा पेच ः कर्मचारी वेतन, पाणीपुरवठा, स्वच्छतेसह अत्यावश्यक सेवांचा प्रश्न ऐरणीवर
-----------
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता.२ ः नाशिक जिल्ह्यातील ६२१ व निफाड तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी विद्यमान सरपंचांनाच सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र या प्रशासकांची सहा महिन्यांची मुदत ऑगस्टमध्ये संपल्याने आता गावपातळीवरील प्रशासनाचा गाडा नेमका कोणाच्या हाती राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-------------
ग्रामपंचायतींचा नियमित कारभार खंडित होऊ नये म्हणून विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून जबाबदारी दिली होती. त्यासोबत उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समितीही करण्यात आली होती. मात्र प्रशासकांना विकासकामे, मोठे आर्थिक निर्णय किंवा टेंडर याबाबत व्यापक अधिकार देण्यात आले नव्हते. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार मासिक वेतन, वीज-पाणी बिले आणि इतर अत्यावश्यक सुविधांवरील खर्चापुरते व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर आता या प्रशासकीय व्यवस्थेलाच ब्रेक लागल्याने ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
१६-१
निफाडमध्ये ९५ गावात परिणाम
विशेषतः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल, स्वच्छता, आरोग्यविषयक अत्यावश्यक बाबी, पथदिवे, वाहनांचे इंधन आदी खर्च कोणाच्या सहीने व कोणत्या अधिकाराने करण्यात येणार, हा प्रश्न गावागावांत उपस्थित होत आहे. निफाड तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींमध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायती हा गावपातळीवरील प्रशासनाचा प्रमुख आधार असल्याने प्रशासकांच्या मुदतीनंतर तातडीने पर्यायी प्रशासकीय व्यवस्था स्पष्ट न झाल्यास नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
१६-१
जिल्ह्यात प्रशासकीय पेच शक्य
मिळालेल्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. राज्यात अशा सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा समावेश होता. प्रशासकांची सहा महिन्यांची मुदत संपल्याने आता या ग्रामपंचायतींच्या पुढील प्रशासकीय व्यवस्थेबाबत शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
१६-१
पाणीपुरवठा, स्वच्छतेचे काय?
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अत्यावश्यक सेवांचा खर्च हा नियमित स्वरूपाचा असल्याने प्रशासकांच्या मुदतीनंतर त्याबाबत तातडीने स्पष्टता होणे गरजेचे आहे. गावातील पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्यास दुरुस्ती, स्वच्छतेसाठी लागणारा खर्च, कचरा वाहतूक, पथदिव्यांची दुरुस्ती किंवा ग्रामपंचायत वाहनासाठी इंधन यांसारख्या बाबींवर निर्णय घेण्यासाठी अधिकृत स्वाक्षरी आवश्यक असते. त्यामुळे गावगाडा चालणार कसा हा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाने तातडीने प्रशासकांना मुदतवाढ द्यायची की नवीन प्रशासकीय अधिकारी नियुक्त करायचे, याबाबत स्पष्ट आदेश देण्याची आवश्यकता आहे.
१६-१ चौकट
नाशिक जिल्ह्यातील चित्र
एकूण ग्रामपंचायती : १,३८८
प्रशासक नियुक्त सरपंच : ६२१
निफाड तालुक्यातील ग्रामपंचायती : ९५