सेवा संकल्प अभियानाला
निफाड तालुक्यात सुरवात
महिनाभर सेवा शिबिरे; योजनांचा थेट लाभ
निफाड, ता.१७ : शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या कमी करून विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचविण्यासाठी निफाड तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध विभागांच्या समन्वयातून सेवा शिबिरे घेऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.
-------------
तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने सेवा सेतूच्या माध्यमातून नागरिकांच्या दारी सेवा पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना शिबिरांमध्येच सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अभियानात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, जिवंत सातबारा मोहीम, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, जमीन खरेदी-विक्री व्यवहार जमिनीच्या मोजणीशी जोडणे यासह विविध कामांना गती दिली जाणार आहे. याशिवाय शिधापत्रिका, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महिला शेतकरी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि शिकाऊ वाहन चालक परवाना यांसारख्या नागरिकोपयोगी सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे.
-------------