NPH26B08709
निफाड ः सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांना लिंबूपाणी देत उपोषण सोडविताना तहसीलदार विशाल नाईकवाडे.
३६-२
अभिलेख कक्षाचे अखेर
दोन महिन्यांत स्थलांतर
सामाजिक कार्यकर्ते काजळेंच्या उपोषणाची दखल
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता.१८ : निफाड तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष नव्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी कारसूळ येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी शुक्रवारी (ता.१८) तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाची प्रशासनाने तातडीने दखल घेत येत्या दोन महिन्यांत अभिलेख कक्षाचे स्थलांतर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
निफाड शहरात छत्रपती संभाजीनगर- नाशिक मार्गालगत सुमारे साडेचार वर्षांपूर्वी नवीन तहसील कार्यालयाची इमारत उभारण्यात आली. बहुतांश कामकाज नव्या इमारतीतून सुरू झाले. मात्र, महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज, जुने अभिलेख व कागदपत्रे असलेला अभिलेख कक्ष अद्याप जुन्या तहसील कार्यालयासमोरील एका खोलीतच सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.अभिलेख कक्ष नव्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. मात्र, या मागणीवर ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर काजळे यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळपासून त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. तहसील प्रशासनाने काजळे यांच्याशी चर्चा केली. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन अभिलेख कक्ष स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी काजळे यांना लेखी आश्वासन दिले. माजी आमदार अनिल कदम यांनी देखील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याशी चर्चा करीत अभिलेख कक्ष तातडीने स्थलांतरित करण्यास सांगितले.
----------------