सहा संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले
---
टीसीएस प्रकरणात युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : बहुराष्ट्रीय टीसीएस या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी सर्व संशयितांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही. कठारे यांनी आरोपींविरोधात सक्षम पुरावे असल्याचे नमूद करीत जामीन नाकारला.
यात आसिफ अन्सारी, रझा रफीक मेमन, शाहरुख कुरेशी, शफीक शेख, तौसिफ अत्तार, अश्विनी अशोक चेनानी यांचा समावेश आहे.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
- आरोपी तपासात सहकार्य करीत होते
- अटक बेकायदेशीर होती
- कोणतेही धर्मांतर झाले नाही
- महिलांना त्रास किंवा छेडछाड करण्यात आलेली नाही
- व्यवस्थापक अश्विनी चेनानी यांच्या बाजूने तर पीडितांकडून लेखी तक्रार नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद
- आरोपी तपासात सहकार्य करीत नव्हते
- निदा खान तब्बल ४० दिवस फरारी होती
- आरोपी फरारी होण्याची शक्यता होती
- पीडितांच्या असहायतेचा गैरफायदा घेत अत्याचार करण्यात आले
- विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केला युक्तिवाद
- सहायक सरकारी वकील व्ही. आर. गायकवाड यांनी केली मदत
पीडित युवतीने न्यायालयात मांडली व्यथा
- सुनावणीदरम्यान एका पीडित युवतीने न्यायालयात हजर राहत स्वतःवर आणि इतर मुलींवर झालेल्या कथित अत्याचारांची माहिती दिली. आरोपींनी परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप तिने केला.
या कारणाने फेटाळले
- आरोपींविरोधात प्राथमिक पुरावे आहेत
- तपास सुरू आहे
- संशयित आरोपी बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो