आरोग्यदूतांच्या कर्तृत्वाचा गौरव
‘सकाळ गौरवगाथे’तून सन्मान; ‘ताज’च्या हिरवळीवर रंगला नेत्रदीपक सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ आणि सायंकाळचा आल्हाददायक गारवा... अशा प्रसन्न वातावरणात ‘सकाळ’ सन्मानार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची लगबग ‘हॉटेल ताज’च्या हिरवळीवर सुरू होती. आरोग्य क्षेत्रात नावलौकिक मिळवून सेवा हीच आपली जबाबदारी मानणाऱ्या आरोग्यदूतांचा गौरव करण्याचे दायित्व ‘सकाळ माध्यम समूहा’ने स्वीकारले आहे. त्यातून साकारलेल्या ‘सकाळ गौरवगाथे’च्या नेत्रदीपक उपक्रमाचा प्रत्यय नाशिककरांना आला.
हॉटेल ताजच्या प्रशस्त प्रांगणात रंगत गेलेला हा सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, कुटुंबीयांची उपस्थिती आणि उत्सवी वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
‘सकाळ आरोग्यसेवा गौरव’ कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर सह्याद्री हॉस्पिटल (मनीपाल हॉस्पिटल्स); तर स्पेशल असोसिएट पार्टनर दीपक डेव्हलपर्स ॲन्ड बिल्डर्स हे होते. या वेळी नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया गुरव, सह्याद्री हॉस्पिटलचे क्लस्टर हेड डॉ. संजय चावला, दीपक डेव्हलपर्स ॲन्ड बिल्डर्सच्या संचालिका देवश्री चंदे यांच्या प्रमुख उपस्थितीने ‘सकाळ गौरवगाथा’ सोहळ्याची रंगत अधिकच वाढत गेली. व्यासपीठावर ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) मारुती दातीर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ३२ सन्मानार्थींना ‘सकाळ गौरवगाथा’ने सन्मानित करण्यात आले.
या नेत्रदीपक सोहळ्यात श्री. सुपेकर प्रास्ताविकात म्हणाले, की ‘सकाळ’तर्फे नेहमीच समाज घटकांच्या कार्याची दखल घेतली जाते. त्यांचा यथार्थ सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य जपण्याचे कार्य डॉक्टर वर्ग करीत असतो. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, या भूमिकेतून आजचा सोहळा होत आहे. ‘सकाळ गौरवगाथा’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महेश अचिंतलवाल यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे व्यवस्थापक (जाहिरात) इसहाक शेख यांनी आभार मानले.
शहराचे आरोग्य राखणे डॉक्टरांच्या हाती
कोणत्याही शहराचा विकास हा आर्थिक व सामाजिक यावरून जसा ओळखला जातो, तसाच वैद्यकीय क्षेत्रातही योगदान महत्त्वाचे असते. आरोग्य निरोगी राखणे हे रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या हाती असते. ही समर्पित सेवा आहे. डॉक्टर स्वतःच्या आयुष्याचे क्षण आणि क्षण रुग्णांसाठी समर्पित करीत असतात. रुग्णाला बरे वाटावे, त्यांचा जीव वाचावा यासाठीच त्यांची धडपड आयुष्यभर सुरू असते. हे योगदान विसरता येण्यासारखे नाही. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातही विकासकामांची ‘सर्जरी’च सुरू आहे. त्यामुळे काहीसा त्रास होतो आहे; परंतु आपल्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करते.
- मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका
.....
डॉक्टरचा रोल करायला आवडेल
‘सकाळ’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एका छताखाली विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टर पाहून मी भारावून गेले. डॉक्टर म्हटले, की रुग्णांना भीती वाटते; परंतु डॉक्टरांचे जे योगदान आहे, ते नाकारता येण्यासारखी नाही. माणसातले माणूस असूनही माणसांसाठी ते देवच आहेत. कोरोनामुळे अनेकांना याची प्रचीती आलेली आहे. कोरोनात डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचचिले आहेत, हे विसरता येण्यासारखे नाही. समाज घटकांनी हे सारे जवळून पाहिले आहे. भविष्यात मला कधी डॉक्टरची भूमिका करण्याची संधी मिळाली, तर ती करायला मला नक्कीच आवडेल.
- अक्षया गुरव, अभिनेत्री
---
आरोग्य सेवा समाजातील महत्त्वाचा घटक ः देवश्री चंदे
शहर हे केवळ त्यात उभारल्या जाणाऱ्या इमारतींवरून मोजले जात नाही. ते शहर किंवा त्या इमारती तेथील लोकांचे जीवनमान किती सुकर करतात, यावरून त्याची खरी ओळख बनते. रिअल इस्टेट आणि आरोग्य सेवा यांचा आपण विचार करतो, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक खोल संबंध आहे. कारण, आम्ही बांधलेल्या प्रत्येक घरामागे एक कुटुंब असते. प्रत्येक व्यावसायिक विकासामागे एक घटक असतो आणि वाढणाऱ्या प्रत्येक परिसरामागे एक असा समाज असतो, ज्याला कालांतराने उत्तम आरोग्य सुविधा, उत्तम शिक्षण, सुलभ दळणवळण आणि चांगल्या नागरी सुविधांची गरज असते. डॉक्टर हे त्या परिसंस्थेचा अत्यंत आवश्यक भाग आहेत. तुम्ही फक्त रुग्णालये बांधत नाहीत किंवा रुग्णांवर उपचार करीत नाहीत, तर अनेकदा अत्यंत तणावाखाली आणि संपूर्ण शहर ठप्प झालेले असतानाही, लोकांचे प्राण वाचविण्याची मोठी जबाबदारी तुम्ही पेलत असता, असे गौरवोद्गार दीपक डेव्हलपर्स ॲन्ड बिल्डर्सच्या संचालिका देवश्री चंदे काढले.
….....
समर्पित सेवेचे व्रत ः संजय चावला
शहराच्या विकासात विविध घटकांचा समावेश असतो. शहराच्या आरोग्याची निगा राखणे ही जबाबदारी वैद्यकीय क्षेत्राची असते. हे समर्पित व्रत असून, सह्याद्री हॉस्पिटल्स त्यासाठी सदैव कटिबद्ध राहिलेले आहे. काही वर्षांपूर्वी नाशिकमधून रुग्णांना मुंबई आणि पुणे या ठिकाणी जावे लागत होते. २०१४ मध्ये सह्याद्री हॉस्पिटल्स नाशिकमध्ये दाखल झाले आणि रुग्णांना सर्व सोयींसह उत्तम आरोग्यासाठीच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ‘सह्याद्री’मधील तज्ज्ञ डॉक्टर हे समर्पित रुग्णसेवा बजावत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सोयी-सुविधांसह तज्ज्ञ डॉक्टर्स आणि उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध असल्याचे प्रतिपादन सह्याद्री हॉस्पिटलचे क्लस्टर हेड संजय चावला यांनी केले.
चौकट
‘सकाळ’ आरोग्यसेवा गौरवगाथा सन्मानार्थी
डॉ. अनिता बांगर, डॉ. आदित्य एकबोटे, डॉ. आश्लेषा पवार, डॉ. आशुतोष मैड, डॉ. अखिल चौधरी, डॉ. अभिजित गुंजाळ, डॉ. अप्सरा मुर्तडक, डॉ. भूषण टिळे, डॉ. चेतन ठाकरे, डॉ. ज्ञानेश्वर मिटके, डॉ. दीपाली भांडारकर-मंडलिक, डॉ. गिरीश देवरे, डॉ. जितेंद्र डोलारे, डॉ. जयेश कोर, डॉ. किशोर मोरे, डॉ. महेश मांगुळकर, डॉ. मुकुल घरोटे, डॉ. एम. एस. अहिरे, डॉ. निशांत गांगुर्डे, डॉ. नीरज गुजराथी, डॉ. नीलेश पगार, डॉ. प्रीती त्रिवेदी, डॉ. पी. के. राव, डॉ. प्रशांत मुसळे, डॉ. रोहन सूर्यवंशी, डॉ. रणजित जोशी, डॉ. सागर मंडलिक, डॉ. समाधान गोर्डे, डॉ. तुषार साळुंके, डॉ. विनोद महाले, डॉ. वीरेंद्र श्रोते, डॉ. योगेश घोंगडे.