लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरी
१० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या रामचंद्र अडके यांना न्यायालयाची शिक्षा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या पोलिस हवालदार रामचंद्र राजाराम अडके यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. न्यायालयाने त्यांना चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
२०१४ मध्ये नाशिक तालुका पोलिस ठाण्यात तक्रारदार आणि त्यांच्या चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिस कोठडी न घेता दोघांना थेट न्यायालयात हजर करण्यासाठी अडके यांनी २३ सप्टेंबर २०१४ रोजी पंचांसमक्ष १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार २४ सप्टेंबर २०१४ रोजी गिरणारे आऊट पोस्ट येथे पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अडके यांना रंगेहाथ पकडले. पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात खटला चालला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सचिन गिरवाडकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पुरावे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने अडके यांना चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलिस निरीक्षक विकास लोंढे, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, प्रभाकर गवळी आणि किरण धुळे यांनी खटल्याचा पाठपुरावा केला.