फोटो : B02932
-----------------
गुणवंत विद्यार्थ्यांमुळे ‘नाएसो’चा
नावलौकिक : प्रा. दिलीप फडके
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : नाशिक एज्युकेशन सोसायटी शिक्षण क्षेत्रात गत १०४ वर्षापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून गौरवशाली इतिहास व उज्ज्वल परंपरा लाभलेली संस्था आहे. संस्थेत शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे संस्थेला नावलौकिक प्राप्त होतो, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी रंगूबाई जुन्नरे हायस्कूल येथे शालांत परीक्षा २०२६ च्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरवाप्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्रा. फडके यांनी ज्या घरट्याने, शाळेने तुम्हाला या यशापर्यंत पोहोचवले आहे, त्या शाळेला कायम लक्षात ठेवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेच्या सर्वच शाळांचे निकाल सर्वोत्तम लागले असून, दुर्गम भागात सुरू असलेल्या आश्रम शाळा वेळुंजे येथील निकाल सतत पंधरा वर्षांपासून शंभर टक्के लागत असल्याचे सांगून सर्वच शाळांचे अभिनंदन व कौतुक केले. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, ॲड. जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम, कार्यकारी मंडळ सदस्य सरोजिनी तारापूरकर, रंजना परदेशी, मैथिली गोखले, सचिन महाजन, शि. म. उपाध्यक्ष राजेंद्र कापसे, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, उमेश कुलकर्णी, पंढरीनाथ बिरारी आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. स्वागत व प्रास्ताविक कार्यवाह राजेंद्र निकम यांनी केले. संस्थेच्या सर्वच शाळांमधून प्रथम आलेली विद्यार्थिनी श्रावणी नांदुर्डीकर हिने शंभर गुण मिळवून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला. या विद्यार्थिनीशी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संवाद साधून अभिनंदन व कौतुक केले. याप्रसंगी संस्थेच्या सर्व शाळांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सहकार्य वाह शैलेश पाटोळे यांनी तर आभार उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी मानले.