आयटक महाराष्ट्रचे २० वे राज्य अधिवेशन नागपूरला
३ ऑक्टोबरला ‘संविधान बचाव-कामगार बचाव’ रॅली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) महाराष्ट्रचे २० वे राज्य अधिवेशन ३ व ४ ऑक्टोबरला नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या पोस्टरचे प्रकाशन दिल्ली येथे ‘आयटक’च्या राष्ट्रीय महासचिव अमरजीत कौर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. संतोष कुमार, ॲड. सुभाष लांडे, डॉ. राम बाहेती, ‘आयटक’च्या राष्ट्रीय सचिव बबली रावत, ‘आयटक’ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस श्याम काळे आणि राज्य सचिव राजू देसले यांच्या हस्ते झाले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (ता. ३) सकाळी दहला नागपूरच्या बालभवन येथून ‘संविधान बचाव–कामगार बचाव’ रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली संविधान चौक येथे पोहोचणार असून, तेथे जाहीर सभा होणार आहे.
‘आयटक’च्या राष्ट्रीय महासचिव अमरजित कौर, खासदार पी. संतोष कुमार, खासदार श्याम बर्गे, मोहन शर्मा, सुकुमार दामले, बबली रावत, सी. जोसेफ मार्गदर्शन करणार आहेत.
अधिवेशनाला राज्यभरातील पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ‘आयटक’शी संलग्न विविध युनियनचे हजारो कामगार, कर्मचारी व योजना कर्मचारी ‘संविधान बचाव–कामगार बचाव’ रॅलीत सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्व कामगार, कर्मचारी व संघटनांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आयटक’ महाराष्ट्रचे राज्य महासचिव श्याम काळे यांनी केले आहे.
अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारच्या कामगार धोरणांचा आढावा घेत कामगार कायद्यातील बदल, खासगीकरण, भांडवलदारधार्जिणी धोरणे आणि कामगारांच्या हक्कांवरील वाढते आक्रमण याशिवाय आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, उमेद कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, ईएसआय, पीएफ, ग्रॅज्युइटी व पेन्शन लागू करणे, बांधकाम कामगार आणि घरकामगारांसह असंघटित कामगारांना व्यापक सामाजिक सुरक्षा देणे यांसह विविध मागण्यांवर अधिवेशनात चर्चा होणार असून, विशेष स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.